नवी दिल्ली : येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे तांबड्या समुद्रातील जहाज वाहतुकीला निर्माण झालेल्या धोक्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी दूरध्वनीवरून चर्चा केली.
मोदी यांनी प्रसारीत केलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'नेतन्याहू यांच्याबरोबर दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चा झाली. येमेनमधील हुथी बंडखोरांचा प्रश्न आणि त्यांच्यामुळे तांबड्या समुद्रातील जहाज वाहतुकीला असलेला धोका यावर एकमेकांचे विचार जाणून घेतले. त्यासह हमास-इस्रायल युद्धावरही बोलणे झाले. युद्ध लवकर थांबवून गाझातील नागरिकांना मानवतावादी मदत पोहोचवण्याबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा समजावून सांगितली.’
गेल्या दोन महिन्यांहुन अधिक काळ सुरू असलेल्या हमास-इस्रायल युद्धाचे परिणाम आता जगाच्या अन्य प्रदेशातही पसरण्यास सुरुवात झाली आहे. गाझा पट्टीतील हमास, लेबॅननमधील हिजबुल्ला आणि येमेनमधील हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. इराण आणि इस्रायलचे वैर आहे. इस्रायलने गाजा पट्टीतील हल्ले जसजसे तीव्र केले आहेत, तसतसे हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रातून इस्रायलला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि रॉकेट्सद्वारे हल्ले सुरू केले आहेत. गेल्या महिनाभरात हुथी बंडखोरांनी किमान १२ जहाजांना लक्ष्य बनवले आहे. त्यापैकी काही प्रकरणांत जहाजे इस्रायलला जात नसतानाही त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. या सर्व प्रकारांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक कंपन्यांनी सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस सुरू राहिली तर जागतिक बाजारपेठेतील इंधनाच्या आणि अन्य जिन्नसांच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, स्पेन आणि बहरीन या देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला आहे. या देशांच्या युद्धनौका संघर्षग्रस्त भागातून जाताना व्यापारी जहाजांची सोबत करणार आहेत. अमेरिकेने ही घोषणा केल्यानंतर मोदी आणि नेतन्याहू यांची चर्चा झाली आहे.