कटरा : जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट अनेक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. त्याच भूमीतील पहलगाममध्ये पाकिस्तानने मानवता आणि काश्मिरियतवर हल्ला केला. भारतामध्ये दंगली घडविण्याचा आणि काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबविणे हा पाकिस्तानचा हेतू होता, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. याप्रसंगी मोदी म्हणाले की, आई वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे देशाच्या रेल्वे प्रणालीशी जोडले गेले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत... असे नेहमीच म्हटले जायचे. पण, आता या रेल्वे नेटवर्कमुळे हे सत्यात उतरले आहे. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत पाकिस्तानवर दंगली घडवण्याचा आरोप केला. मोदी यांनी यावेळी ४६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली.
पराभव कायम लक्षात राहील
पंतप्रधान पुढे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील प्राचीन संस्कृती, येथील परंपरा, येथील आध्यात्मिक चेतना, निसर्गाचे सौंदर्य, येथील औषधी वनस्पती ही येथील रत्ने आहेत. आपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे. पण, जम्मू-काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदर्भ देत मोदी म्हणाले की, आज ६ जून आहे. योगायोगाने एक महिन्यापूर्वी याच रात्री पाकिस्तानवर कारवाई करण्यात आली होती. आता जेव्हा जेव्हा पाकिस्तान ‘ऑपरेशन सिंदूर’चे नाव ऐकेल, तेव्हा त्यांना त्यांचा लज्जास्पद पराभव आठवेल, अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली.
आजचा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा एक उत्सव आहे. आमच्या सरकारचे भाग्य आहे की, आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली आणि आम्ही ते पूर्ण केले. या प्रवासात अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत दरडी कोसळणे...अशा विविध समस्या आल्या. हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक होते, परंतु आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान दिले, असेही मोदी म्हणाले.
संशयितांच्या घरांवर छापे
मोदींच्या दौऱ्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस, निमलष्करी दल, सैन्य आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारी वैयक्तिकरीत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. घटनास्थळांभोवती मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे परिसरात लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी खोऱ्यातील संशयितांच्या घरांवर छापे अधिक तीव्र करण्यात आले, ज्यात ओव्हरग्राऊंड वर्कर्स आणि सीमेपलीकडून सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
अंजी पूलाचेही उद्घाटन
मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जम्मूमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. पंतप्रधान इंजिनमध्ये बसून चिनाब आर्च पुलावरून ‘केबल स्टेड’ अंजी पुलावर पोहोचले. येथे त्यांनी रेल्वेच्या अंजी पुलाचेही उद्घाटन केले. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह पूल बांधकाम कामगारांची भेट घेतली.
‘आयफेल टॉवर’पेक्षाही उंच पूल
काश्मीर खोऱ्याला देशाच्या अन्य भागाशी सुलभतेने जोडणारा एक भव्य पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. पॅरिसमधील ‘आयफेल टॉवर’पेक्षाही त्यांची उंची अधिक आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा (३२४ मीटर) ३५ मीटर उंच आणि कुतुबमिनारपेक्षा सुमारे पाच पट अधिक उंचीचा आहे. हा रेल्वे पूल ४० किलो टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा ८ रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी ३० किमी वेगाने रेल्वे जाऊ शकते. हा पूल ताशी २६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे.
पुलाची लांबी १३१५ मीटर, ४६७ मीटरचा मेन आर्क
चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पूल बारामुल्लास उधमपूर-कटरा-काजीगुंडमार्गे जम्मूला जोडणारा आहे. तो १३१५ मीटर लांब असून त्यामध्ये ४६७ मीटरचा मेन आर्क स्पेस आहे. हा आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही ब्रॉड गेज लाइनवरील सर्वाधिक लांबीचा आर्क स्पॅन आहे.
३०,३५० टन स्टीलचा वापर, प्रवासात २० ते २२ तासांची घट
पूल सुरू झाल्यावर ट्रेनने मालवाहतूक केली जाऊ शकेल व वेळेत २० ते २२ तासांची घट होईल. या पुलासाठी आतापर्यंत ३०,३५० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. नदीपासून ३५९ मीटर उंचीवर हा पूल आहे. हा पूल १२० वर्षे टिकून राहील अशी त्याची रचना आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे हा पूल एक प्रतीक बनला आहे.
दरम्यान, शनिवार, ७ जूनपासून कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू होणार आहे. आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगरदरम्यान आठवड्यातून ६ दिवस दोन गाड्या धावतील. उत्तर रेल्वेने सांगितले की, ट्रेनमध्ये दोन प्रवास वर्ग आहेत. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आहे. सध्या गाड्या फक्त बनिहाल येथे थांबतील, इतर थांब्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
१० तासांचा प्रवास ३ तासांत
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही, हिमवर्षावाच्या काळात काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटलेला असतो. राष्ट्रीय महामार्ग-४४ बंद असल्याने खोऱ्यात जाण्याचा मार्ग बंद आहे. याशिवाय, जम्मू ते काश्मीर रस्त्याने जाण्यासाठी ८ ते १० तास लागत होते. ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास सुमारे तीन तासांत पूर्ण होईल.
माझे डिमोशन - अब्दुल्ला
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, माझे तर डिमोशन झाले आहे. ते म्हणाले, गेल्या ११ वर्षांत जम्मू आणि काश्मीरसाठी सुरू झालेल्या सर्व रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी मी मोदींसोबत उपस्थित आहे, हे माझे भाग्य आहे. आज स्टेजवर बसलेले सर्व ४ जणही तेथे होते. मनोज सिन्हा तेव्हा रेल्वे राज्यमंत्री होते. आता त्यांना जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून बढती देण्यात आली आहे, तर माझे डिमोशन झाले आहे. मी एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. आता एका केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. अशा प्रकारे त्यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.
‘वंदे भारत’ला हिरवा झेंडा
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग जम्मू-काश्मीरच्या नवीन ताकदीची ओळख आहेत. चिनाब पूल असो किंवा अंजी पूल... हे जम्मू-काश्मीरसाठी समृद्धीचे साधन बनतील. या सुरुवातीमुळे केवळ पर्यटन वाढणार नाही, तर अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू-काश्मीरच्या रेल्वे संपर्कतेमुळे दोन्ही प्रदेशातील व्यावसायिकांसाठी नवीन संधी निर्माण होतील, उद्योगाला गती मिळेल, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कटरा आणि श्रीनगरदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला. ही काश्मीर खोरे आणि जम्मू प्रदेशातील पहिली रेल्वे सेवा आहे.
मोदीच पूर्ण राज्याचा दर्जा देतील - ओमर अब्दुल्ला
ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले, 'लवकरच परिस्थिती सामान्य होईल. मला आशा आहे की, मोदी लवकरच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देतील. याशिवाय, हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे आणि यासोबतच जम्मू-काश्मीरच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे. मोदी स्वतः सक्रिय असल्याने आणि प्रत्येक क्षणी काश्मीरच्या विकासाचे अपडेट्स घेत असल्याने हा विकास शक्य झाला आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले.
चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन
चिनाब पुलासाठी ३०,३५० टन स्टीलचा वापर
पुलाची लांबी १३१५ मीटर,
४६७ मीटरचा मेन आर्क
‘आयफेल टॉवर’पेक्षाही उंच पूल
अंजी ब्रिज उद्घाटन, देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल
जम्मू ते काश्मीर खोरे १० तासांचा प्रवास ३ तासांत
कटरा-श्रीनगर मार्गावरील ‘वंदे भारत ट्रेन’ सेवेला हिरवा झेंडा