
भोपाळ : पहलगाम दहशतवादी हल्ल्यास भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले ते ऑपरेशन सिंदूर आता शौर्याचे प्रतीक बनले आहे. यापुढे दहशतवाद्यांच्या गोळ्यांना दारुगोळ्यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हे एकदा पाकिस्तानला दिला. ऑपरेशन सिंदूर हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि यशस्वी ऑपरेशन होते, असेही मोदी म्हणाले.
मोदी शनिवारी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सक्षमीकरण महासंमेलनात सहभागी झाले आणि अनेक प्रकल्पांची सुरुवात केली. याचदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरुद्धचे सर्वात मोठे ऑपरेशन आहे. आपल्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ भारतीयांचे रक्त सांडले नाही तर त्यांनी आपल्या संस्कृतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आमच्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी भारताच्या नारीशक्तीला आव्हान दिले आहे. हे आव्हान दहशतवाद्यांसाठी आणि त्यांच्या आकांसाठी काळ ठरले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इतिहासातील दहशतवाद्यांविरुद्धचे सर्वात मोठे आणि सर्वात यशस्वी ऑपरेशन आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
घरात घुसून मारू
आता आम्ही घरात घुसूनही मारू आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. भारतातील प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, जर तुम्ही गोळी झाडली तर गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जाईल. पाकिस्तानी सैन्याने याचा विचारही केला नव्हता, तिथे जाऊन आमच्या सैन्याने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. सिंदूर हे आमच्या परंपरेचे प्रतीक आहे, आता ते भारताच्या शौर्याचे प्रतीक आहे.
नारीशक्तीचे सामर्थ्य
ऑपरेशन सिंदूर हे आपल्या नारीशक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, या ऑपरेशनमध्ये बीएसएफने खूप मोठी भूमिका बजावली आहे. बीएसएफच्या मुली काश्मीरपासून गुजरातपर्यंत जबाबदारी घेत होत्या. त्यांनी सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफच्या शूर कन्यांनी अद्भूत शौर्य दाखवले आहे, संपूर्ण जग मुलींचे शौर्य पाहत आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.