खंबीर सरकारचे फायदे जनतेला कळले - मोदी; 'तपपूर्ती'निमित्त NDA पक्षांची विशेष बैठक

खंबीर सरकारचे फायदे काय असतात याची जनतेला आता पूर्ण जाणीव झाली आहे आणि त्यामुळेच देशातील लोक आता राजकीय स्थैर्य आणि खंबीर सरकारला प्राधान्य देत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.
खंबीर सरकारचे फायदे जनतेला कळले - मोदी;  'तपपूर्ती'निमित्त NDA पक्षांची विशेष बैठक
खंबीर सरकारचे फायदे जनतेला कळले - मोदी; 'तपपूर्ती'निमित्त NDA पक्षांची विशेष बैठकPhoto X (Narendra Modi)
Published on

नवी दिल्ली : खंबीर सरकारचे फायदे काय असतात याची जनतेला आता पूर्ण जाणीव झाली आहे आणि त्यामुळेच देशातील लोक आता राजकीय स्थैर्य आणि खंबीर सरकारला प्राधान्य देत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.

मोदी सरकारच्या कारकीर्दीची बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने बुधवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची एक विशेष बैठक झाली. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'विकसित भारत' हे केवळ एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे स्वप्न राहिलेले नसून, ते आता देशातील प्रत्येक नागरिकाचा संकल्प बनले आहे. "माझ्यासाठी देशातील जनता हीच ईश्वराचे रूप आहे," असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

"२०१४ पूर्वीची अनेक दशके ही राजकीय अस्थिरता आणि उलथापालथीची होती. परंतु, आता जनता एका स्थिर सरकारचे काम अनुभवत आहे आणि सरकारच्या धाडसी व निर्णायक निर्णयांचे कौतुक करत आहे," अशी जोडही त्यांनी दिली.

“काँग्रेसच्या कुटील चक्रातून मुक्ती”

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, एनडीए सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी देशाला काँग्रेसच्या "कुटिल चक्रातून" मुक्त केले. "२०१४ मध्ये जेव्हा एनडीएचा विजय झाला, तेव्हा मी म्हणालो होतो की आज सामान्य माणसासाठी एका नव्या आशेची पहाट उजाडली आहे. काँग्रेसच्या विश्वासघातानंतर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला. एनडीए परिवार म्हणून आम्ही जनतेचा हा विश्वास अधिक दृढ केला आहे," असे मोदी यांनी नमूद केले. मोदी यांनी सर्वाधिक काळ सलग लोकनियुक्त पंतप्रधान राहण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक नेत्यांकडून मिळालेले शुभेच्छा संदेश, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळालेली मानवंदना आणि देशभरात भाजप नेत्यांकडून करण्यात आलेली 'पूजा-आरती' याद्वारे हा दिवस साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळात कौतुकाचा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे 'निर्वाचित' पंतप्रधान बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एकमुखाने अभिनंदन प्रस्ताव मंजूर केला. भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांनी उभे राहून पंतप्रधान मोदींना टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.

मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. जवाहरलाल नेहरू यांचा निर्वाचित पंतप्रधान म्हणून ४,३९८ दिवसांचा विक्रम मोदी यांनी मोडीत काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक स्वावलंबी, सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून "नवी शिखरे सर करत राहील", असा विश्वास या ठरावात व्यक्त करण्यात आला आहे.

हा सर्व घटक पक्षांचा गौरव

पंतप्रधानांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाचे श्रेय एनडीएच्या सर्व मित्रपक्षांना दिले. ते म्हणाले, "सर्वात जास्त काळ सलग सेवा देणारा निवडून आलेला पंतप्रधान म्हणून मिळालेला कार्यकाळ, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे एकत्रित यश आहे."

देशातील जनतेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या १४० कोटी जनतेने जी स्वप्ने पाहिली आहेत, त्या सर्व आकांक्षा नक्कीच पूर्ण केल्या जातील. आमच्यासाठी नेहमीच 'पार्टीपेक्षा देश मोठा' राहिला असून, देशाचे हित हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच, आमच्या सरकारसाठी 'सुधारणा' ही कोणतीही सक्ती किंवा मजबुरी नसून, ती आमची दृढ निष्ठा आणि वचनबद्धता आहे.

logo
marathi.freepressjournal.in