संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

भारताचा सर्वात मोठा शत्रू कोणताही देश नाही, तर आपले परावलंबित्व हाच देशाचा मोठा शत्रू आहे, हे परावलंबित्व संपवून आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करावयाचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.
Published on

भावनगर : भारताचा सर्वात मोठा शत्रू कोणताही देश नाही, तर आपले परावलंबित्व हाच देशाचा मोठा शत्रू आहे, हे परावलंबित्व संपवून आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करावयाचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील भावनगर येथे आयोजित 'समुद्र से समृद्धी' कार्यक्रमावेळी देशभरातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांसाठी एकूण ३४,२०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च अपेक्षित आहे.

यावेळी मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल २६,३५४ कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये छारा बंदरावर एचपीएलएनजी री-गॅसिफिकेशन टर्मिनल, पीएम-कुसुम योजनेंतर्गत ४७५ मेगावॉट सोलर फीडर, ४५ मेगावॉटचा बादेली सोलर प्रकल्प, कच्छमधील धोर्डो हे पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव बनणे, भावनगर आणि जामनगर येथील सरकारी रुग्णालयांचा विस्तार, ७० किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरीकरण आदी कामांचा समावेश आहे.

...तर आत्मसन्मान दुखावेल

मोदी म्हणाले, आपण दुसऱ्या देशावर अवलंबून राहून चालणार नाही. आपण इतर देशांवर जितके अवलंबून राहू तितकी आपली अधोगती होत राहील आणि ते आपले खूप मोठे अपयश असेल. जगभरात शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी जगात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या या आपल्या देशाला स्वावलंबी व्हावेच लागेल. आपण दुसऱ्या देशांचे आश्रित बनून राहिलो तर आपला आत्मसन्मान दुखावेल. १४० कोटी लोकसंखेच्या या देशाचे भविष्य आपण दुसऱ्या देशांच्या हाती सोपवू शकत नाही, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in