नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे भेट घेतली. मात्र, या भेटीचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंड, मालदीवच्या दौऱ्यावरून आल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची रविवारी भेट घेतली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारकडून कोणते मोठे पाऊल उचलण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या भेटीत काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती जाहीर झाली नाही. पण, अचानक एकाच दिवसात पंतप्रधान व गृहमंत्री राष्ट्रपतींना स्वतंत्रपणे भेटले. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
५ ऑगस्टचे खास महत्त्व
उद्या, ५ ऑगस्ट आहे. मोदी सरकारने याच दिवशी आतापर्यंत मोठे निर्णय घोषित केले आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवले, ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले होते.