संविधानाचे उल्लंघन भारतीय कधीही विसरू शकत नाहीत - मोदी

आपल्या संविधानाचे झालेले उल्लंघन कोणताही भारतीय कधीही विसरू शकत नाही. संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ४२ वी घटनादुरुस्ती हे त्यांच्या कृतीचे प्रमुख उदाहरण आहे.
संविधानाचे उल्लंघन भारतीय कधीही विसरू शकत नाहीत - मोदी
Published on

नवी दिल्ली : आपल्या संविधानाचे झालेले उल्लंघन कोणताही भारतीय कधीही विसरू शकत नाही. संसदेचा आवाज दाबण्यात आला आणि न्यायालयांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ४२ वी घटनादुरुस्ती हे त्यांच्या कृतीचे प्रमुख उदाहरण आहे. गरीब, उपेक्षित आणि दलितांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले होते, अशी टीका करीत मोदी यांनी आणीबाणीला ५० वर्षे झाल्यानिमित्त कॉंग्रेसवर हल्लाबोल केला.

भारताच्या लोकशाही इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक असलेल्या आणीबाणीला बुधवारी पन्नास वर्षे पूर्ण झाली. या काळात तत्कालीन काँग्रेस सरकारने लोकशाहीला वेठीस धरले होते, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.

आणीबाणीविरुद्ध लढणाऱ्यांना सलाम

आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सलाम करतो. हे लोक संपूर्ण भारतातून, प्रत्येक क्षेत्रातून, वेगवेगळ्या विचारसरणीतून आले होते. या सर्वांनी एकाच उद्देशाने एकत्र काम केले. भारताच्या लोकशाही संरचनेचे रक्षण करणे आणि ज्या आदर्शांसाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. हाच आदर्श जपण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यांच्या या सामूहिक संघर्षामुळेच तत्कालीन काँग्रेस सरकारला लोकशाही पुनर्संचयित करावी लागली आणि नव्या निवडणुका घ्याव्या लागल्या, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला, असेही मोदी यांनी म्‍हटले आहे.

गरीब आणि वंचितांची स्वप्ने पूर्ण करू!

आम्ही आपल्या संविधानातील तत्त्वे अधिक दृढ करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहोत. आम्ही प्रगतीची नवी शिखरे गाठू आणि गरीब व वंचितांची स्वप्ने पूर्ण करू, अशी ग्‍वाहीही मोदी यांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in