दुर्गापूर : पश्चिम बंगालच्या विकासात तृणमूल काँग्रेस सरकार मोठी बाधा आणत आहे. पश्चिम बंगालला विकास व बदल हवा आहे. पण, तृणमूल काँग्रेस सरकार त्यात खोडा घालत आहे. जेव्हा राज्यातून तृणमूल काँग्रेस सरकार जाईल, तेव्हा राज्याचा खरा विकास होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दुर्गापूर येथील सभेपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५,४०० कोटी रुपयांच्या योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले.
मोदी म्हणाले की, भाजपने पश्चिम बंगालसाठी समृद्ध व विकसित भविष्याचे स्वप्न बघितले आहे. या योजना ते साकार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. एक काळ होता की, लोक रोजगारासाठी बंगालमध्ये येत होते. आता परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. आता बंगालचे लोक दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जात आहेत. मी भाजप व माझ्यातर्फे तुम्हाला आवाहन करतो की, एकदा तुम्ही भाजपला संधी द्या. असे सरकार निवडा जे तुमचे काम करेल. जे इमानदार व दमदार असेल, असे मोदी म्हणाले.
मोतिहारी (बिहार) : नोकरीची खोटी आश्वासने देऊन राष्ट्रीय जनता दलाने गरीबांच्या जमिनी लाटल्या. काँग्रेस, राजद सरकारने बिहार लुटण्याचे काम केले आहे, अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘विकसित बिहार’ हे पूर्व भारताच्या विकासाची किल्ली ठरेल, असे आश्वासन बिहारच्या जनतेला दिले.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मोतिहारी येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी ७ हजार कोटी रुपयांच्या विविध योजनांचे उद्घाटन केले.
‘नवीन बिहार बनणार, जेव्हा पुन्हा रालोआ सरकार’ येणार अशी घोषणा करून मोदी म्हणाले की, काँग्रेस व राजदने कायमच गरीबांच्या नावाने राजकारण केले. या दोन्ही पक्षांनी कायमच राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. आमचे सरकार आल्यास पाटणा हे पुण्यासारखे, तर गया हे गुरुग्रामसारखे बनवू, अशी घोषणा मोदी यांनी केली.
ते म्हणाले की, चंपारणच्या या मातीने इतिहास लिहिला आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात याच मातीने गांधीजींना दिशा दिली. आता याच मातीच्या प्रेरणेतून बिहारचे नवीन भविष्य बनवणार आहे. बिहार ही आंदोलनाची भूमी आहे. आता ही भूमी बिहारच्या विकासाला नवीन दिशा देईल. राज्याच्या चौफेर विकासासाठी रालोआ सरकार वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले.
२०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवेची संधी दिली. आम्ही सूडाचे राजकारण बंद केले. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या हक्काचे पैसे कसे लुटले हे जाणण्याचा सध्याच्या तरुण पिढीला हक्क आहे, असे मोदी म्हणाले.