

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी रात्री फोनवरून चर्चा झाली. या चर्चेत मुख्यत्वे आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून दोन्ही देश व्यापार करारावर शिक्कामोर्तब करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी व्यापार, महत्त्वाच्या तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याबाबत मतांची देवाणघेवाण केली.
दोन्ही नेत्यांनी समान हितसंबंध पुढे नेण्यासाठी आणि सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी परस्पर सहकार्य सुरू ठेवण्याचे ठरवले. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याचे महत्त्व मोदी आणि ट्रम्प यांनी अधोरेखित केले. नेत्यांनी महत्त्वाच्या तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा आणि इतर प्राधान्य क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा केली. ही सर्व क्षेत्रे २१ व्या शतकातील उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तसेच समान हितसंबंध पुढे नेण्यासाठी जवळून सहकार्य करण्याचे ठरवले.