...तर सापाला त्याच्या बिळातून बाहेर काढून ठेचू! मोदींचा पाकिस्तान व दहशतवाद्यांना इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दहशतवादाची तुलना सापाशी केली. जर पुन्हा दहशतवादाने वळवळ सुरू करून फणा काढला तर सापाप्रमाणे त्याला बिळातून बाहेर खेचून ठेचले जाईल, असा इशारा मोदी यांनी पाकिस्तानला दिला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही संपलेले नसल्याचे स्पष्ट केले.
...तर सापाला त्याच्या बिळातून बाहेर काढून ठेचू! मोदींचा पाकिस्तान व दहशतवाद्यांना इशारा
Published on

कराकत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दहशतवादाची तुलना सापाशी केली. जर पुन्हा दहशतवादाने वळवळ सुरू करून फणा काढला तर सापाप्रमाणे त्याला बिळातून बाहेर खेचून ठेचले जाईल, असा इशारा मोदी यांनी पाकिस्तानला दिला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही संपलेले नसल्याचे स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून भारत सातत्याने पाकिस्तानला दहशतवादापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणे थांबवले नाही आणि पुन्हा भारतात एखादी दहशतवादी घटना घडवली तर त्यांनी गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, अशी स्पष्ट भूमिका भारताने जाहीर केली आहे. जर पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर सापाप्रमाणे बिळातून बाहेर काढून चिरडून टाकू, असा इशारा मोदी यांनी बिहारमधून दहशतवाद्यांना दिला.

पंतप्रधानांनी त्यांच्या गेल्या बिहार दौऱ्यावेळी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील, अशी घोषणा केल्याची आठवण यावेळी करून दिली व ते म्हणाले की, भारतीय सैन्य दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून ते साध्य केले आहे.

रोहतासचे जिल्हा मुख्यालय असलेल्या सासारामच्या नावामध्ये ‘राम’ शब्द आहे. प्रभू श्रीरामांचे धोरण ‘प्राण जाये पर वचन न जाये’ असे होते. दहशतवादाविरुद्ध भारताची लढाई थांबणार नाही. मी बिहारमधून वचन दिले होते की, पहलगाम हल्ल्यात ज्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर पुसले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आपल्या संरक्षण दलांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत, असे रोहतासमध्ये पंतप्रधान म्हणाले.

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने, मोदींनी उपस्थितांना जंगलराज आणि सामाजिक न्यायाचे खोटे दावे करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. “ज्यांनी गरीब आणि मागासलेल्यांसाठी काहीच केले नाही, ज्यांनी बिहारच्या लोकांना राज्य सोडण्यास भाग पाडले, ते आता सामाजिक न्यायाबद्दल बोलत आहेत,” असे ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही संपलेले नाही. या कारवाईने भारताने जगाला देशी बनावटीच्या शस्त्रांची ताकद दाखवून दिली आणि त्यामुळेच युद्ध थांबविण्याची विनंती पाकिस्तानला करणे भाग पडले, असे मोदी म्हणाले. मोदींच्या हस्ते यावेळी ४७ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. देशाचा शत्रू कोठेही असो, त्याला संपवणारच, असा निर्धारही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in