
दाहोद : देश आजमितीला निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून विश्वासाच्या प्रकाशात तिरंगा फडकावत आहे, जो कोणी आमच्या माता-भगिनींचे कुंकू (सिंदूर) पुसण्याचा प्रयत्न करील त्याचा खात्मा निश्चित आहे, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दहशतवाद्यांना दिला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मूल्ये, भावनांची अभिव्यक्ती
मोदी म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जे काही केले त्यानंतर भारत गप्प बसू शकेल का, मोदी गप्प बसू शकतील का, विचार करा, जर कोणी आपल्या माता-भगिनींचे कुंकू (सिंदूर) पुसण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा खात्मा निश्चित आहे. ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीय मूल्यांची आणि आपल्या भावनांची अभिव्यक्ती आहे. दहशतवाद्यांनी १४० कोटी भारतीयांना आव्हान दिले होते. म्हणूनच मोदीने तेच केले आणि त्यासाठीच देशवासीयांनी आपल्याला प्रधानसेवकाची जबाबदारी दिली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
सैन्याच्या शौर्याला सलाम
मोदी पुढे म्हणाले, मोदीशी पंगा घेणे एवढे महागात पडू शकते, असा विचार कधी स्वप्नातही दहशत पसरवणाऱ्यांनी केला नसेल. त्यांनी २२ तारखेला जो खेळ खेळला होता, तो आम्ही हाणून पाडला. आमच्या सैन्याने पाकिस्तानी सैन्याला पार धूळ चारली. आम्ही देशाच्या सैन्याच्या शौर्याला सॅल्यूट करतो.
आज आपण खेळण्यांपासून ते लष्करी शस्त्रांपर्यंत सर्व काही देशांमध्ये निर्यात करतो. आज भारत रेल्वे, मेट्रो आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान बनवतो आणि जगाला निर्यातही करतो. नुकताच हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. काही लोकांना शिव्या देण्याची सवयच लागली आहे. ते म्हणायचे की निवडणुका आल्या, मोदीजींनी पायाभरणी केली, काहीही होणार नाही. आज, तीन वर्षांनंतर या कारखान्यात पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह बनून तयार झाले आहे. आज त्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, असेही मोदी म्हणाले.
...तर माझी गोळी आहेच
नरेंद्र मोदी यांनी भूज येथील जाहीर सभेत पाकिस्तानमधील नागरिकांना इशारा दिला. तुम्ही सुखाचे आयुष्य जगा, भाकर खा नाहीतर माझी गोळी आहेच. पाकिस्तानातून दहशतवाद संपविण्यासाठी तेथील नागरिकांना पुढे यावे लागेल. तरूणांना पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही सुखाने जगा, भाकर खा नाहीतर माझी गोळी आहेच.” यावेळी पंतप्रधान मोदींनी ५३,४०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले.