मोदी 2024 ला पंतप्रधान होतील, पण...

मोदी पुन्हा पंतप्रधान होतील पण ते आपला कार्यकाळ पुर्ण करणार नाहीत. ते त्याआधीच पायउतार होतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
मोदी 2024 ला पंतप्रधान होतील, पण...

2024 च्या लोकसभा निवडणुकांना एक वर्ष शिल्लक आहे. यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. देशातील विरोधी पक्षांकडून मात्र 2024 ला केंद्रातील भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं टिकैत पुन्हा सक्रिय झाले आहेत. यानंतर टिकैत यांनी केंद्रसरकारवर जोरदार हल्ला चढवला.

यावेळी राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदी पुन्हा पंतप्रधान होतील पण ते आपला कार्यकाळ पुर्ण करणार नाहीत. ते त्याआधीच पायउतार होतील, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही मोदींना पदावरुन हटवणार नाहीत. ते स्वत: पंतप्रधान पदावरुन पायउतार होतील. याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. मोदींना देशाचा राष्ट्रपती बनायचं आहे. त्यामुळे आपला कार्यकाळ पुर्ण करण्याअगोदर ते पंतप्रधान पदावरुन पायउतार होतील, असं टिकैत म्हणाले आहेत.

यावेळी टिकैत यांना 2024 च्या लोकसभेनंतर राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी या पैकी कोण पंतप्रधान व्हायला हवं? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी माझ्या बोलण्याने कोणी कोणाला पंतप्रधान करणार नाही. या दोघांपैकी ज्याला लोक निवडतील, तोच पुढला पंतप्रधान होईल. असं म्हणतं ज्यांनी व्यवस्थेवर नियंत्रण मिळवलं आहे, तोच पुढचा पंतप्रधान होईल. असं म्हटलं आहे.

तसंच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाला देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली आहे. त्यांना याबाबतचा प्रश्न विचारला गेल्यावर त्यांनी योगींना पंतप्रधान बनवा, मोदींपेक्षा ते बरे आहेत, असं म्हटलं आहे. तसंच योगींना काम केलं जाऊ देत नसून त्यांच्या कामात अडथडा निर्माण केला जात असल्याचा दावा देखील टिकैत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे दावे केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in