'आप'ला चिरडण्यासाठी मोदींचे प्रयत्न; काही दिवसांनी ममता,स्टॅलिन,उद्धवही तुरुंगात जातील: केजरीवालांचे गंभीर आरोप

'वन नेशन वन लीडर' या अंतर्गत मोदीजींना देशातील सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवायचे आहे आणि ही निवडणूक जिंकायची आहे.
'आप'ला चिरडण्यासाठी मोदींचे प्रयत्न; काही दिवसांनी ममता,स्टॅलिन,उद्धवही तुरुंगात जातील: केजरीवालांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आम आदमी पक्षाला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. कथित मद्यधोरण घोटाळ्यातील मनी लाँडिंग प्रकरणात केजरीवाल यांना शुक्रवारी, १० मे रोजी जामीन मंजूर झाला आणि संध्याकाळी ते तिहार तुरुंगातून बाहेर आले. आज (दि. ११ मे) त्यांनी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल म्हणाले, 'आमच्यावर बजरंग बली आणि देशवासियांचा आशीर्वाद आहे, त्यांच्या कृपेमुळे मी तुरुंगातून बाहेर आलो. हा बजरंग बलीचा चमत्कारच आहे. आम्ही एक छोटा पक्ष आहोत, ज्याला चिरडण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. आमच्या चार नेत्यांना एकत्र तुरुंगात पाठवले. मोठ्या पक्षांचे चार प्रमुख नेते तुरुंगात गेले. तर, पक्ष संपतो. पण, हा पक्ष नाही, ही एक कल्पना आहे आणि तिला चिरडण्याचा प्रयत्न केला तर, तो वाढतच जातो", असे ते म्हणाले.

त्यांनी देशातील सर्व लुटारूंना आपल्या पक्षात घेतले...

पीएम मोदींवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, 'जो कोणी मोदीजींना भेटायला जातो, तो पहिली १०-१५ मिनिटे आम ​​आदमी पक्षाबद्दल बोलतो. आगामी काळात आम आदमी पक्ष भाजपला आव्हान देणार आहे, असे त्यांना वाटते, त्यामुळे आपला पक्ष चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी तुम्हाला चिरडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ७५ वर्षात कोणत्याच पक्षाला जेवढा त्रास दिला नाही, तेवढा आम आदमी पक्षाला दिला. मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय, असे पंतप्रधान म्हणायचे. पण त्यांनी देशातील सर्व लुटारू आणि चोरांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे," असा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

मोदींना देशातील सर्व विरोधी नेत्यांना संपवायचे

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, 'पंतप्रधानांनी अतिशय धोकादायक मिशन सुरू केले आहे. त्या मिशनचे नाव आहे. 'वन नेशन वन लीडर' या अंतर्गत मोदीजींना देशातील सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवायचे आहे आणि ही निवडणूक जिंकायची आहे. काही दिवसांनी ममता दीदी, तेजस्वी यादव, एम. के. स्टॅलिन, पिनाराई विजयन, उद्धव ठाकरेही तुरुंगात जातील. सर्व विरोधी पक्षनेते तुरुंगात असतील, असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in