महिला हा स्वतंत्र 'जातसमूह' विकसित भारत संकल्प यात्रेत मोदींचे वक्तव्य

महिला हा स्वतंत्र 'जातसमूह' विकसित भारत संकल्प यात्रेत मोदींचे वक्तव्य

सर्व महिलांनी एकत्र राहायला हवे. आजकाल काही लोक महिलांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. सर्व महिला म्हणजे एक स्वतंत्र जात आहे.

नवी दिल्ली : देशातील समस्त महिला हा स्वतंत्र जातसमूह आहे. त्या एकत्रित आल्या तर कोणतेही आव्हान पेलू शकतात. महिलांनी विभाजनवादी राजकारणापासून दूर राहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदी यांनी शनिवारी विकसित भारत संकल्प यात्रेच्या महिला लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

सर्व महिलांनी एकत्र राहायला हवे. आजकाल काही लोक महिलांमध्ये तेढ निर्माण करत आहेत. सर्व महिला म्हणजे एक स्वतंत्र जात आहे. त्या एकत्र येऊन कोणतेही आव्हान पेलू शकतात, असे मोदी म्हणाले. महिलांनी त्यांच्यामध्ये फूट पाडणाऱ्या राजकारणाबद्दल जागरूक राहिले पाहिजे. असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

भाजपने अनेक कल्याणकारी योजनांसह महिला मतदारांना प्रामुख्याने आकर्षित केले आहे. काही सर्वेक्षणांमध्ये असे दिसून आले आहे की, त्याचा फायदा पक्षाला मिळाला असून महिलांनी भाजपला अधिक प्रमाणात मतदान केले आहे. मोदी यांनी या संवादातून देशाच्या अनेक भागांतील महिला लाभार्थींची मते जाणून घेतली. यावेळी महिलांनी कोविड काळात त्यांना मिळालेली सरकारी मदत, जल-जीवन मिशनमधून गावात निर्माण जालेल्या पाणीपुरवठ्याच्या सुविधा, 'पीएम स्वानिधी योजने'द्वारे व्यवसायास मिळालेले प्रोत्साहन आदी अनुभव कथन केले.

logo
marathi.freepressjournal.in