पंच्याहत्तरीनंतर इतरांना संधी द्यावी! मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा रोख कुणाकडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतर काही जण तुम्हाला शुभेच्छा देतात. त्या शुभेच्छांचा अर्थ म्हणजे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतर काही जण तुम्हाला शुभेच्छा देतात. त्या शुभेच्छांचा अर्थ म्हणजे आता तुम्ही थांबले पाहिजे आणि दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, असा होतो’, असे वक्तव्य भागवतांनी केल्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याची चर्चा सध्या सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणार आहेत, त्यामुळे त्यांच्या या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी भागवत म्हणाले की, “वृंदावन येथे आयोजित संघाच्या एका बैठकीत तत्कालीन सरकार्यवाह शेषाद्री यांनी मोरोपंतांचा शाल पांघरून सत्कार केला होता. त्यावेळी मोरोपंतांनी हलक्या शब्दांत पण गंभीर अर्थाने सांगितले होते, पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की समजावं, आता वेळ थांबायची आहे. बाजूला होऊन नव्या पिढीला संधी द्यावी.” भागवत यांनी ही आठवण सांगताना मोरोपंत पिंगळे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. पण या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

आणीबाणीनंतर मोरोपंत पिंगळे यांनी केलेली भाकिते कशी खरी ठरली, याबाबतची आठवणही भागवत यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, “आणीबाणीनंतर जर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर सुमारे २७६ जागांवर विजय मिळवू शकतील. निकाल समोर आले तेव्हा योगायोगाने २७६ जागाच जिंकल्या गेल्या. मात्र निकालावेळी मोरोपंत हे सातारा जिल्ह्यातील सज्जनगड किल्ल्यावर कार्य करत होते. त्यांना या निकालाची जराशीही कल्पना नव्हती.”

मोदी या नियमांचे पालन करणार का? -राऊत

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार घेतला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह यांसारख्या नेत्यांना वयाची पंच्याहत्तरी गाठल्यानंतर जबरदस्तीने निवृत्ती पत्करायला भाग पाडले. आता मोदी या नियमांचे पालन करतात का? हेच आम्हाला बघायचे आहे,” असा टोला राऊत यांनी हाणला.

logo
marathi.freepressjournal.in