
इंदूर : ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा उल्लेख करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी अखंड भारताचे ध्येय पूर्ण करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. ‘आपणही विभागले गेलो आहोत, पण आपण ते पुन्हा परत मिळवू, असे मोहन भागवत म्हणाले.
मध्य प्रदेशातील इंदूर येथे कॅबिनेट मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या 'परिक्रमा कृपा सार' या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी भारताचा विकास आणि भविष्याबद्दल भूमिका मांडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते की, ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारत टिकणार नाही, विभागला जाईल. पण, असे झाले नाही. आता स्वतः इंग्लंडच विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे. पण, आपण वेगवेगळे झालो नाही. आपण पुढे जात राहू, आपण याआधी विभागले गेलो होतो, पण आपण तेही परत घेऊन टाकू, असे भाष्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भारतीयांच्या पूर्वजांनी अनेक धर्म, पंथांच्या माध्यमातून अनेक मार्ग दाखवले आहेत. ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची त्रिवेणी संतुलित आयुष्याचा प्रवाह सुरू ठेवते.
जीवन जगण्याच्या या पारंपरिक मार्गावर भारतीय आजही श्रद्धा ठेवतात. त्यामुळेच सगळ्यांची भाकिते खोटी ठरतात आणि देश सातत्याने विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
भारत जगाच्या शिरपेचातील तुरा होता
आपापल्या स्वार्थामुळे जगात वेगवेगळे संघर्ष सुरू राहतात. त्यामुळे इतक्या समस्या समोर येतात. भारत ३००० वर्षे जगाच्या शिरपेचातील तुरा होता. तेव्हा जगात कोणताही संघर्ष नव्हता. भारतात गोमाता, नद्या आणि वृक्ष यांची पूजा केली जाते. त्या माध्यमातून निसर्गाची उपासना केली जाते. निसर्गासोबतचे देशाचे नाते आजही जिवंत आहे. हे सगळे चैतन्याच्या अनुभूतीवर आधारलेले आहे, असे ते म्हणाले.
ज्ञान आणि कार्य
आज जग निसर्गासोबतच्या या नात्यासाठी तडफडत आहे. मागील ३००-३५० वर्षांमध्ये जगभरातील देशांना सांगितले जात आहे की, लोग वेगवेगळे आहेत आणि जो शक्तिशाली आहे, तोच टिकणार आहे. त्यांना सांगितले जात आहे की, कुणाच्या पोटावर पाय ठेवून किंवा कुणाचा गळा कापून जर ते शक्तिशाली बनू शकत असतील, तर ते बरोबर आहे, अशी खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केली. माणसासाठी ज्ञान आणि कार्य हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे आहेत. निष्क्रिय ज्ञानी कुणाच्याही कामाचा नाही. ज्ञानी लोक निष्क्रिय झाल्यामुळेच सगळी गडबड होते. जर कर्म करणाऱ्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल, तर ते वेड्यांनी केलेले कर्म ठरते, असेही भागवत म्हणाले.