स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

देशाच्या स्वातंत्र्याबाबत भारतीयांनी आत्मसंतुष्ट राहू नये. असे सांगत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी मेहनत घेणे आणि त्याग करणे आवश्यक आहे, तसेच जगाच्या समृद्धी आणि शांततेसाठी योगदान देणेही गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले.
स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी त्याग करणे आवश्यक! सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन
Photo : X (ANI)
Published on

भुवनेश्वर : देशाच्या स्वातंत्र्याबाबत भारतीयांनी आत्मसंतुष्ट राहू नये. असे सांगत स्वातंत्र्य टिकवण्यासाठी भारतीयांनी मेहनत घेणे आणि त्याग करणे आवश्यक आहे, तसेच जगाच्या समृद्धी आणि शांततेसाठी योगदान देणेही गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त भुवनेश्वर येथील संघ कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, स्वतंत्र भारतालाही जगाप्रती आपले कर्तव्य पार पाडावे लागेल. जग गेली २,००० वर्षे असंख्य समस्यांशी झुंजत आहे, पण त्यावर मात करण्यात अयशस्वी ठरले आहे.

आपल्या पूर्वजांनी सर्वोच्च त्याग करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपणही त्यांच्याप्रमाणेच कष्टाळू व्हायला हवे आणि त्याच प्रकारे त्याग करून स्वातंत्र्य टिकवायला हवे. देशाचा आत्मविश्वास वाढवून ‘विश्वगुरु’ म्हणून भांडणात गुरफटलेल्या जगाला मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

भारतीयांनी जगालाही मार्गदर्शन केले पाहिजे. भारत जगात शांतता आणि आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आपला ‘धर्म’ इतरांसोबत वाटून घेण्यास इच्छुक आहे, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, संपूर्ण जगात पर्यावरणीय समस्या आणि वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत, विश्वगुरू म्हणून इतरांना मार्गदर्शन करणे, समस्या सोडवणे आणि जगाला शांत व समृद्ध बनवणे, हे भारताचे कर्तव्य आहे.

“स्वतंत्र” या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना भागवत म्हणाले, ‘स्वतंत्र’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, ‘स्व’ म्हणजे स्वतः आणि ‘तंत्र’ म्हणजे शासन. देश स्वतंत्र झाला आहे आणि आता जनता शासन चालवत आहे,” असे ते म्हणाले.

नवे जग उभारणे ही आपली जबाबदारी!

आपल्या देशातील प्रत्येकाला सुख, धैर्य, सुरक्षितता, शांती आणि सन्मान मिळावा, यासाठीच आपण स्वातंत्र्य मिळवले. मात्र, जग आज अस्थिरतेच्या भोवऱ्यात सापडले आहे. जगाला उपाय देणे आणि धार्मिक तत्त्वांवर आधारित आनंद व शांततेने भरलेला नवे जग उभारणे, ही आपली जबाबदारी आहे, असे भागवत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in