तब्बल २४ वर्षांनंतर ओडिशाला मिळाला नवा मुख्यमंत्री, मोहन माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

ओडिशामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून मोहन माझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
मोहन माझी
मोहन माझी

भुवनेश्वर: ओडिशामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. भाजपकडून मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले असून, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते. भव्य मैदानावर झालेल्या या समारंभात राज्यपाल रघुबर दास यांनी मोहन माझी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे.

माझी यांच्यासोबत 'या' मंत्र्यांनीही घेतली शपथ -

मुख्यमंत्री मोहन माझी यांच्यासोबत त्यांचे दोन उपमुख्यमंत्री कनकवर्धन सिंग देव आणि प्रवती परिदा यांनीही शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांसह सुरेश पुजारी, रबीनारायण नायक, नित्यानंद गोंड आणि कृष्ण चंद्र पात्रा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

पंतप्रधान मोदींची शपथविधी सोहळ्याला हजेरी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पंतप्रधान मोदी मंचावर पोहोचताच राज्यपाल रघुबर दास आणि नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन माझी यांनी त्यांचे स्वागत केले.

कोण आहेत मोहन माझी?

मोहन चरण माझी हे केओंझर मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिले आहेत. माझी हे आदिवासी समाजातील आहेत. ते त्यांच्या सार्वजनिक सेवा आणि संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखले जातात. २०२४ मध्ये केओंझार विधानसभा मतदारसंघातून माझी यांनी बीजेडीच्या मिना माझी यांचा ११, ५७७ मतांनी पराभव केला.

ओडिशात पहिल्यांदाच भाजप सरकार-

ओडिशात भाजपाने विधानसभेच्या १४७ पैकी ७८ जागा जिंकून सत्ता दणदणीत विजय मिळवला, विरोधात असलेल्या बीजेडीला केवळ ५१ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला. तर माकपला एक जागा मिळाली. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

logo
marathi.freepressjournal.in