पाकिस्तानचे मंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाल्याचं वृत्त आहे. लंडनमध्ये ब्रिटिश परराष्ट्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी नक्वी यांची कार थांबवून कारची कसून झाडाझडती घेतल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओद्वारे केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, लंडनमध्ये ब्रिटिश परराष्ट्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर नक्वी यांची कार थांबवण्यात आली. यानंतर कारमध्ये स्फोटके किंवा अंमली पदार्थ आहेत का, याची झडती घेण्यात आली. यावेळी, मोहसीन नक्वी कारमध्येच बसले होते, असेही सांगितले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे पाकिस्तानच्याच पत्रकाराने संबंधित घटनेचा व्हिडिओ शेअर केल्याने या दाव्याला बळ मिळाले आहे. पाक पत्रकार सईद युसूफझाईने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी मोहसीन नक्वी लंडन दौऱ्यावर
पाकिस्तानी पत्रकार सईद युसूफझाई यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "गृहमंत्री मोहसिन नक्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शहजाद अकबर आणि आदिल राजा यांच्या पाकिस्तानला प्रत्यार्पणाबाबत चर्चा करणार आहेत.”
वृत्तानुसार, मोहसीन नक्वी हे पाकिस्तानमधील काही व्यक्तींचे प्रत्यार्पण आणि मायदेशी परत पाठवण्याबाबत चर्चा करण्यासाठी लंडन दौऱ्यावर गेले आहेत. यात पाकिस्तानमध्ये गंभीर गुन्हे, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोप असलेल्या शहजाद अकबर आणि आदिल राजा यांसारख्या व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही
नक्वी यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, या संपूर्ण प्रकरणाबाबत पाकिस्तान उच्चायुक्त किंवा ब्रिटिश सरकारने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. माहितीनुसार, ही तपासणी ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयात परिसरातील अत्यंत कडक सुरक्षेचा एक नियमित भाग असू शकते. त्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी काटेकोरपणे केली जाते. व्हायरल व्हिडिओतील दाव्यानंतर, पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला आहे.
नेटकऱ्यांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
नेटकरी या घटनेची चांगलीच मजा घेताना दिसतायेत. तशाप्रकारच्या एकाहून एक मजेशीर कमेंट्स व्हिडिओखाली वाचायला मिळत आहेत. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष नक्वी यांनी अजूनही आशिया कप २०२५ ट्रॉफी भारताला दिलेली नाही. त्यावरून एका X युजरने , "ते आशिया कपची ट्रॉफी शोधत आहेत, जी या चोराकडे अजूनही आहे," असे लिहिले.
व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून, नेटकरी मोहसीन नक्वी आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत आहेत. एका X युजरने लिहिले की,"लाजिरवाणे? नाही. अपेक्षितच होते. जर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला असता तर खरा धक्का बसला असता."
तर, दुसऱ्या X युजरने लिहिले की, "छान, पाकिस्तानच्या लोकांना दररोज काय काय सहन करावे लागते याची त्याला (नक्वी यांना) मजा घेऊ द्या."