

पुणे / प्रतिनिधी
देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट आलेली असतानाच एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज फोरकास्ट्सच्या वेदर ताज्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) यंदा भारतात वेळेपूर्वीच दाखल होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सूनचा प्रवास मे महिन्याच्या मध्यातच सुरू होईल. अंदमान आणि निकोबार बेटांवर १८ ते २५ मे दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत मिळत असून केरळमध्येही २५ मेच्या आसपास मोसमी पाऊस दाखल होईल असा संभव आहे.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आणि अंदमान समुद्रात नैऋत्येकडून येणारे वारे सध्या वेगाने सक्रिय होत असून, यामुळे अंदमान बेटांवर या काळात सरासरीपेक्षा ३० ते ६० मिमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, अंदमानच्या उत्तरेला उष्णकटिबंधीय प्रणाली तयार होण्याची २० ते ४० टक्के शक्यता आहे, जी मान्सूनला पुढे ढकलण्यासाठी बूस्टर म्हणून काम करेल.
यंदा मान्सून वेळेवर आणि बळकट येण्यामागे काही भौगोलिक घटक महत्त्वाचे ठरत आहेत. मान्सूनच्या आगमनावेळी एल निनोचा प्रभाव नसेल, जे भारतीय पावसाळ्यासाठी मानले जाते. सकारात्मक याव्यतिरिक्त, इंडियन ओशन डायपोलदेखील मान्सूनसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जेव्हा हिंदी महासागराचा पश्चिम भाग पूर्वेकडील भागापेक्षा अधिक उबदार असतो, तेव्हा अधिक आर्द्रता भारतीय उपखंडाकडे खेचली जाते, ज्यामुळे मान्सून अधिक प्रभावी होतो. सध्याची वाढलेली उष्णता देखील मान्सूनचे वारे लवकर खेचण्यास मदत करत आहे. जर वातावरणातील ही स्थिती कायम राहिली, तर लाखो लोकांसाठी मान्सूनचे हे लवकर होणारे आगमन केवळ उष्णतेपासून सुटका देणारेच ठरणार नाही, तर शेतीकामांसाठीही एक वरदान ठरेल.
आरंभीच जोरदार वृष्टी
'मौसम तक'चे संस्थापक देवेंद्र त्रिपाठी यांच्या अंदाजानुसार, २५ मे च्या सुमारास मान्सून केरळमध्ये धडकू शकतो. मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्येही मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला होता आणि यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणारे वारे अधिक तीव्र होतील, ज्यामुळे आर्द्रता थेट भारताच्या नैऋत्य किनारपट्टीकडे येईल. यामुळे केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.