
नवी दिल्ली : मान्सून रविवारी संपूर्ण देशभरात सक्रिय झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. यंदा मान्सूनने तब्बल ९ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला आहे. दिल्लीसह देशाच्या उर्वरित भागांमध्येही मान्सून दाखल झाला आहे. हिमाचलपासून केरळपर्यंत आणि उत्तराखंडपासून उत्तर प्रदेशपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. ४ जुलैपर्यंत देशाच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही स्थिती २९ जून २०२५ रोजी सकाळी ०८:३० वाजेपर्यंत कायम होती. या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेली आहे. पुढील दोन दिवसांत ही प्रणाली हळूहळू उत्तर ओदिशा, गंगा, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दिशेने सरकेल. त्यामुळे बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.