
नवी दिल्ली : यंदा मान्सून लवकर भारतात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. आता नैऋत्य मोसमी पाऊस आणखी लवकरच म्हणजेच २५ मेपर्यंत केरळात दाखल होणार आहे, असा नवा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
२००९ मध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. आता १६ वर्षांनी मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन होण्याची शक्यता आहे. येत्या २५ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, त्यानंतर हळहळू मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असणार आहे. देशात यंदा १०७ टक्क्यांच्या आसपास पाऊस पडण्याची शक्यता आहे.
केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे, मात्र याचदरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणजे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. येत्या छत्तीस तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.