आला रे आला, मान्सून आला! १६ वर्षांत पहिल्यांदाच लवकर एंट्री; केरळात ८ दिवसआधीच बरसला, राज्यात १ जूनला आगमनाची शक्यता

केरळमध्ये आठ दिवस आधीच मान्सून डेरेदाखल झाला असून गेल्या १६ वर्षांत नियोजित वेळेपेक्षा लवकर एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
आला रे आला, मान्सून आला! १६ वर्षांत पहिल्यांदाच लवकर एंट्री; केरळात ८ दिवसआधीच बरसला, राज्यात १ जूनला आगमनाची शक्यता
Published on

मुंबई/कोझिकोड : मे महिन्यातच राज्याला मान्सूनपूर्व म्हणजेच अवकाळी पावसाचा तडाखा बसला असतानाच, आता पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले आहे. केरळमध्ये आठ दिवस आधीच मान्सून डेरेदाखल झाला असून गेल्या १६ वर्षांत नियोजित वेळेपेक्षा लवकर एंट्री होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. आता मान्सूनच्या आगमनानंतर पुढील प्रवासासाठी प्रतिकूल वातावरण असल्यामुळे मुंबईत १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. आता यंदा मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गुजरात, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील सात दिवस या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. केरळव्यतिरिक्त दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागात मान्सून पुढे वाटचाल करणार आहे. तसेच दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाची हवामान प्रणाली निर्माण झाल्याची नोंद आहे. पुढील ३६ तासांत उत्तरेकडे सरकताना ही कमी दाबाची हवामान प्रणाली आणखी मजबूत होऊ शकते आणि पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.

यंदा देशभरात पाऊस सरासरी आणि सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशात मान्सूनचा परिणाम शेतीवर होत असतो. मान्सून वेळवर झाल्यास देशातील कृषी क्षेत्राचे उत्पादन चांगले येते. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो. धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने पाणीटंचाईचे संकटही दूर होते.

२७ मेपर्यंत समुद्रात जाण्यास बंदी

हवामान खात्याने केरळच्या किनारी आणि अंतर्गत भागात वादळाचा इशारा जारी केला आहे. मच्छिमारांसह सामान्य लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर २७ मेपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

राज्यात १ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत वरुणराजाचे आगमन होईल, असा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी भागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, पुढच्या दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७३ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस कणकवली येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. समुद्रात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने वादळसदृश स्थिती निर्माण होऊन समुद्र खवळला आहे. त्यामुळे ३ नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in