
नवी दिल्ली : देशातील बहुतेक भागात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरातमध्ये पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे जवळपास ५ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. हिमाचलमधील दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासांत ४ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या असून ८ जण बेपत्ता झाले आहेत.
हिमाचलच्या कुल्लूमधील जीवा नाला, गडसा खोऱ्यातील शिलागड आणि बंजरमधील होरंगध येथे तसेच कांगडा जिल्ह्यातील धरमशाला येथे ढगफुटी झाली. ढगफुटीमुळे डोंगरातील झाडांसोबत दगडही रस्त्यावर वाहून आल्याने जंगलात प्रचंड प्रमाणात वृक्ष उन्मळून पडल्याचे चित्र दिसत आहे. धरमशालामध्ये २० कामगार वाहून गेले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसामुळे कुल्लू मनालीमध्ये नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. कुल्लूमध्ये वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठावर असलेल्या वीज प्रकल्पाची शेड पाण्यात वाहून गेली. कुल्लू येथील जीवा नालाजवळील एनएचपीसी प्रकल्प स्थळावरून आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कलाकोट तहसीलमधील सियालसुई भागात आलेल्या पुरात दोन मुलांचा मृत्यू झाला असून आणखी एका मुलाला वाचवण्यात यश आले. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात तीन मुले वाहून गेली. पोलीस आणि स्थानिक लोकांसह बचाव पथकाने तत्काळ बचावकार्य सुरू केले, परंतु दोघांचा जीव वाचवता आला नाही.
दरम्यान, मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज शहराजवळील वीरपूर गावात गुरुवारी मुसळधार पावसात झोपडी पडून पाच जण जखमी झाले. बळींमध्ये एक जोडपे आणि त्यांची तीन मुले होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा नवीन मार्ग बंद
जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा टेकड्यांवर असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा नवीन मार्ग पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे बंद करण्यात आला. जुन्या मार्गाने तीर्थयात्रा सुरळीतपणे सुरू आहे, तर बॅटरी कार आणि हेलिकॉप्टर सेवा दोन्ही बंद आहेत.
अहमदाबाद-मुंबई महामार्गावर वाहतूककोंडी
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या १२ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अहमदाबाद शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेकडील भागातील मणिनगर, वटवा, सीटीएम, हटकेश्वर, निकोल ओधव आणि विराट नगरसह अनेक भाग पाण्याखाली गेले. बडोदा शहराजवळून जाणाऱ्या अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील जांबुवा ब्रिज रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने १५ किमी लांबीची वाहतूककोंडी झाली होती.
वर्धा तालुक्यात पूर
महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे देवळी तालुक्यातील दिगडोह गावात पूर आला. येथील स्मशानभूमीत अडकलेल्या एका विद्यार्थ्यासह तिघांना गुरुवारी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले. गावातील शेतात पाणी भरल्यामुळे लोकांना उंच ठिकाणी जावे लागले आहे.