निकोबार बेटांवर मान्सून दाखल; महाराष्ट्रात ९ ते १६ जूनदरम्यान आगमन

नैऋत्य मान्सून रविवारी देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली.
निकोबार बेटांवर मान्सून दाखल; महाराष्ट्रात ९ ते १६ जूनदरम्यान आगमन

नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून रविवारी देशाच्या दक्षिणेकडील निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली. मान्सून ३१ मेपर्यंत केरळ आणि ९ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामानशास्त्र विभागानुसार, यंदाची अनुकूल ला-निना परिस्थिती, तसेच विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील थंडी भारतात चांगल्या पावसाला मदत करेल. नैऋत्य मान्सून रविवारी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, दक्षिण अंदमान समुद्रात तसेच निकोबार, मालदीव, कोमोरिन बेटांच्या आसपास पोहोचला आहे. तो ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून सुरू होण्याची तारीख गेल्या १५० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे.

सध्या देशाचे बरेचसे भाग उष्णतेच्या लाटेशी झुंज देत आहेत. कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अनेक राज्यांमधील तापमानाचे विक्रम मोडीत निघत आहेत आणि आरोग्य आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहेत. दक्षिण भारतात एप्रिलमध्ये उष्णतेची लाट आली. सध्या वायव्य भारतात तशीच स्थिती आहे. उष्णतेमुळे पॉवर ग्रीड्सवर ताण पडत आहे आणि जलस्रोत कोरडे पडत आहेत. देशाच्या काही भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे यंदा सामान्यपेक्षा जास्त मान्सूनच्या पावसाचा अंदाज देशासाठी मोठा दिलासा आहे. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे. शेती लागवडीखालील ५२ टक्के क्षेत्र त्यावर अवलंबून आहे. जून आणि जुलै हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे महिने असून या काळात खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या होतात. देशभरातील वीजनिर्मिती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय भरून काढणे देखील महत्त्वाचे आहे.

चार राज्यांत उष्णतेचा रेड अलर्ट

देशाच्या वायव्य भागात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली असून हवामान खात्याने चार राज्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यात दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानचा समावेश आहे. नवी दिल्लीतील नजफगड आणि पितमपुरा भागांत रविवारी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्लीची सापेक्ष आर्द्रता दिवसभरात ५७ टक्के ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान होती. हवामान आणि आरोग्य विभागाने नागरिकांना उष्णतेपासून बचावाचे उपाय अनुसरण्याचा, तसेच भरपूर पाणी आणि द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in