'मोन्था' चक्रीवादळ आज आंध्र प्रदेशला धडकणार

दरम्यान, अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने गेल्या सहा तासांत सुमारे ८ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे वाटचाल सुरू केली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘मोन्था’ हे ‘तीव्र चक्रीवादळ’मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असून, ते २८ ऑक्टोबरच्या सायंकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम यांच्यामधील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने सोमवारी दिली.

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले चक्रीवादळ गेल्या सहा तासांत सुमारे १७ किलोमीटर प्रतितास वेगाने उत्तर-पश्चिमेकडे सरकले आहे. आज दुपारी २.३० वाजता ते चेन्नईपासून सुमारे ४४० किमी पूर्वेस, काकीनाडापासून ४९० किमी दक्षिण-दक्षिण-पूर्वेस, विशाखापट्टणमपासून ५३० किमी दक्षिण-दक्षिण-पूर्वेस आणि ओदिशातील गोपालपूरपासून ७१० किमी दक्षिण-दक्षिण-पश्चिमेस केंद्रित होते.

दरम्यान, अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने गेल्या सहा तासांत सुमारे ८ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे वाटचाल सुरू केली. आज दुपारी २.३० वाजता ते गुजरातमधील वेरावळपासून ५७० किमी नैऋत्येस, मुंबईपासून ६५० किमी पश्चिम-दक्षिण-पश्चिमेस, गोव्यातील पणजीपासून ७१० किमी पश्चिम-उत्तर-पश्चिमेस, लक्षद्वीपमधील अमिनी दिवीपासून ८५० किमी वायव्येस आणि मंगळुरूपासून ९२० किमी वायव्येस केंद्रित असल्याचे हवामान खात्याने सांगितले. हा कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तासांत पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून जवळपास ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणम चक्रीवादळ इशारा केंद्राचे प्रभारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांनी सांगितले की, येत्या पाच दिवसांत किनारी जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २९ ऑक्टोबरनंतर परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, मच्छिमारांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कुमार यांनी सांगितले, ‘काल रात्री ११.३० वाजता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘चक्रीवादळ मोन्था’मध्ये झाले. आज हे चक्रीवादळ बंगालच्या दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व उपसागरावर केंद्रित आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ईस्ट कोस्ट रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.

आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवा - मुख्यमंत्री

आंध्रात धडकणाऱ्या ‘मोन्था’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवा, असे आदेश मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहेत.

१०० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून, २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. ते पुढे उत्तर-पश्चिमेकडे सरकत राहील आणि सायंकाळी किंवा रात्री काकीनाडा परिसरात आंध्र किनारपट्टी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग प्रति तास ९० ते १०० किमी असून, काही ठिकाणी तो ११० किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in