नवी दिल्ली : देशातील चार राज्यांतील १५ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (३३.३० टक्के), कटेहारी (५६.६९ टक्के), खाईर (४६.४३ टक्के), कुंद्रकी (५७.३२ टक्के), करहाल (५३.९२ टक्के), माझवान (५०.४१ टक्के), मीरपूर (५७.०२ टक्के), फुलपूर (४३.४३ टक्के), सिसामाऊ येथे (४९.०३ टक्के) मतदान झाले. उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त नवदीप रिंवा म्हणाले की, पाच पोलिसांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्याने त्यांना निलंबित केले आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मतदारसंघात ५६.७८ टक्के मतदान झाले. तर पंजाबच्या चार विधानसभा मतदारसंघात ५९.६७ टक्के मतदान झाले. गिड्डरबाहा मतदारसंघात ७८.१० टक्के, डेरा बाबा नानकमध्ये ५९.८० टक्के, बर्नाला ५२.७० टक्के, छबेवाल ४८.०१ टक्के मतदान झाले. तसेच केरळच्या पालक्कड मतदारसंघात ५४.६४ टक्के मतदान झाले.
नांदेड लोकसभेसाठी ५३.७८ टक्के मतदान
नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७८ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विरुद्ध भाजपचे संतुकराव हंबर्डे यांच्यात लढत आहे.
प्रदूषणामुळे ५० टक्के कर्मचाऱ्यांना‘ वर्क फ्रॉम होम’
दिल्ली सरकारच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. तसेच खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांसाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ राबवण्याचे आवाहन केले आहे. तसेच खासगी कंपन्यांनी आपली कार्यालये १०.३० ते ११ वाजता सकाळी सुरू करावीत. त्यामुळे गर्दीच्या काळात वाहनांची वाहतूक कमी होऊ शकेल. कार्यालयांच्या वेळेत बदल केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच वाहनांतून प्रदूषण कमी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शटल बससेवा सुरू करण्याच्या सूचना
तसेच खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी शटल बस सेवा सुरू करावी. ही सेवा दिल्ली सरकारने सुरू केली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. येत्या काही दिवसात परिस्थितीत सुधारणा होईल, असे राय यांनी सांगितले.
झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्के मतदान
रांची : झारखंडमध्ये विधानसभेच्या ३८ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले. सत्ताधारी जेएमएमप्रणित इंडिया आघाडी पुन्हा सत्तेवर येणार की भाजपप्रणित रालोआ झारखंडवर राज्य करणार हे शनिवारी कळेल.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.५९ टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर ‘मट्राईझ’च्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. रालोआ आघाडीला ८१ पैकी ४६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार, रालोआला ४५ ते ५० जागा तर इंडिया आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना ३ ते ५ जागा मिळतील.