
अहमदाबाद : महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तरी गुजरात विधानसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय नक्की होणार असल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे करतानाच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले. भाजपला मदत होईल असे काम काहीजण आतून करीत आहेत, अशा १०, १५, २० किंवा ३० लोकांना पक्षातून काढावे लागले तरी बेहत्तर, असा इशारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला.
राहुल गांधी म्हणाले की, जे लोक पक्षाच्या विचारधारेविरोधात काम करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गुजरात काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. एक जे पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत आणि जनतेची कामे करीत आहेत. दुसऱ्या प्रकारातले लोक भाजपशी हातमिळवणी केलेले आहेत. अशा लोकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. काँग्रेसच्या नावावर काम करायचे आणि विरोधकांशी संधान साधायचे, असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत.
राहुल गांधी हे सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटनेची बैठक घेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र या बैठकीत ते पक्षातील नेत्यांवर चांगलेच संतप्त झाल्याचे पाहावयास मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नक्की विजय होणार. असे सांगताना त्यांनी पक्ष संघटनेतील मरगळ झटकून टाकण्याचे आवाहन केले. तसेच काही लोक आतून भाजपला मदत होईल, असे काम करत आहेत. अशा लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल, असा स्पष्ट इशारा राहुल गांधी यांनी दिला.
काँग्रेसला मजबुतीची गरज
काँग्रेसमध्ये नेत्यांना कमी नाही. परंतु संघटनेला मजबूत करण्याची गरज आहे. पक्ष जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर गुजरातचे लोक आपल्याला बळ देणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन जनतेची सेवा केली पाहिजे. गुजरात राज्य सध्या अडचणीत असून राज्याला दिशा देण्याची गरज आहे. महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांनी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी येथेच कष्ट घेतले होते. गुजरातचे युवक, व्यापारी आणि महिलांसाठी आपल्याला लढावे लागेल, असे आवाहन राहुल गांधींनी कार्यकर्त्यांना केले.
काय म्हणाले राहुल गांधी?
अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन दिले. ते म्हणाले, गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर, विद्यार्थी यांना आता पर्याय हवा आहे. त्यांना ‘बी’ टीम नको आहे. पक्षात जे दोन गट पडले आहेत, त्यात विभागणी करणे ही माझी जबाबदारी आहे. पहिले काम म्हणजे दोन गटांना वेगळे करायचे. यासाठी कडक कारवाई करावी लागली, काही लोकांना काढावे लागले तरी आपण त्यांना काढून टाकू.
आपला जिल्हाध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेता असो, त्याच्या हृदयात काँग्रेस असायला हवी, विजय किंवा पराभवाची गोष्ट सोडा. काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा नेता, त्याचा हात जर कापला तर त्यातूनही काँग्रेस वाहायला हवी. संघटनेचे नियंत्रण अशा एकनिष्ठ लोकांच्या हातात जायला हवे. आपण जेव्हा हे काम करू तेव्हा गुजरातमधील जनता वादळाप्रमाणे आपल्या संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करेल, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.