कमकुवतकडून सर्वोत्तम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल; राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक

देशाची अर्थव्यवस्था मागील दशकभराच्या कालावधीत जगातील पाच कमकुवत अर्थव्यवस्थांमधून जगातील पहिल्या सर्वोत्तम पाच अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असून मेड इन इंडिया आता जागतिक ब्रॅन्ड झाला असल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संसदेतील अभिभाषणात दिली.
कमकुवतकडून सर्वोत्तम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल; राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून केंद्र सरकारच्या कामगिरीचे कौतुक

नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था मागील दशकभराच्या कालावधीत जगातील पाच कमकुवत अर्थव्यवस्थांमधून जगातील पहिल्या सर्वोत्तम पाच अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट असून मेड इन इंडिया आता जागतिक ब्रॅन्ड झाला असल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी संसदेतील अभिभाषणात दिली.

बुधवारी नरेंद्र मोदी सरकार-२ च्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपतींनी प्रथेनुसार लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांना संयुक्तरित्या संबोधित केले. राष्ट्रपतींनी संसदेच्या नव्या सदनातील पहिल्यांदाच दिलेल्या आपल्या भाषणादरम्यान अर्थव्यवस्थेसंबंधित विविध मुद्यांवर भाष्य करतांना सरकारच्या गेल्या दहा वर्षातील घवघवीत कर्तृत्वावर प्रकाश टाकला. राष्ट्रपती म्हणाल्या, ‘‘गेल्या दहा वर्षांत आपल्या अर्थव्यवस्थेने कमकुवत अर्थव्यवस्थांच्या गटातून जगातील पहिल्या पाच मोठ्या अर्थव्यवस्थात समाविष्ट होण्याजोगा कायापालट केला आहे. दहा वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा जगातील पहिल्या दहा मोठ्या अर्थव्यवस्थांत समावेश होता. आता पहिल्या पाच अर्थव्यवस्थांत समावेश झाला आहे.’’

‘‘दहा वर्षांपूर्वी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे १५८ लाख कोटी रुपये होते. आज आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अंदाजानुसार आपली अर्थव्यवस्था जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून सकल राष्ट्रीय उत्पन्न दुपटीने वाढून सुमारे ३०७ लाख कोटी रुपये झाले आहे. तसेच आता आपला मेड इन इंडिया ब्रॅन्ड जागतिक ब्रॅन्ड झाला आहे. भारताच्या मेक इन इंडिया धोरणावर संपूर्ण जग उत्साही आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या ध्येयाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. आज जगभरातील कंपन्या भारतातील उभरत्या औद्योगिक क्षेत्रांबाबत उत्साही आहेत. सेमीकंडक्टर क्षेत्रात आलेल्या विदेशी गुंतवणुकीतून हे सोदाहरण सिद्ध झाले आहे. सेमीकंडक्टरमधील या गुंतवणुकीचा फायदा लक्षणीयरित्या देशातील इलेक्ट्रॉनिक्स व वाहन निर्मिती उद्योगांना झाला आहे.’’ गेल्या दहा वर्षातील सरकारच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकतांना राष्ट्रपती म्हणाल्या, ‘‘भारताची निर्यात ४५० अब्ज डॉलरवरुन आता ७७५ अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे. तसेच देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत देखील दुपटीने वाढ झाली आहे. देशात आयकर रिटर्न फार्इल करणाऱ्या करदात्यांची संखया ३.२५ कोटींवरुन तब्बल ८.२५ कोटींपर्यंत वाढली आहे. दशकापूर्वी या देशात काही शेकड्या इतकीच नवोद्योगांची (स्टार्टअप) संख्या होती आता ती लाखांच्या पार गेली आहे. दहा वर्षांपूर्वी देशात वार्षिक ९४ हजार नव्या कंपन्यांची नोंदणी होत होती तर आता ही संख्या १.६ लाख झाली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये देशात ९८ लाख जीएसटी करदाते होते. तर आता १.४० कोटी जीएसटी करदाते आहेत. तसेच २०१४ पूर्वीच्या दहा वर्षात देशात १३ कोटी वाहनांची विक्री झाली होती तर त्यानंतरच्या दहा वर्षात २१ कोटी वाहनांची विक्री झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. संसदेच्या नव्या इमारतीविषयी राष्ट्रपती म्हणाल्या की या नव्या सदनात सरकारी धोरणांवर सकारात्मक चर्चा होर्इल आणि देश स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारत होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करेल.

जगात अनेक ठिकाणी संघर्ष आणि तंटे सुरू असताना भारताने आपले हित जगासमोर अत्यंत ठामपणे मांडण्यासाठी परराष्ट्र धोरणातील आधीच्या सर्व मर्यादा तोडल्या आहेत. ऐतिहासिक जी-२० शिखर परिषदेमुळे देशाची जगातील पत वाढली आहे. या परिषदेदरम्यान भारताने आफ्रिकन संघाला कायम सदस्य करुन घेण्याच्या भारताच्या प्रयत्नांची संपूर्ण जगाने वाखाणणी केली आहे. आज भारत जगातील दहशतवादा विरोधीचा प्रमुख आवाज झाला आहे. जगात प्रतिकूल वातावरण असतांनाही भारताने विश्वमित्र होउन दाखवले आहे,’’ असे मुर्मु म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in