Video : कोर्टरूममध्ये पाणी पिणे 'लॉ'च्या विद्यार्थ्याला महागात पडले, न्यायाधीशांनी बोलावून...

विद्यार्थ्याने बाटलीतून पाणी पिण्याचे 'धाडस' करताच न्यायाधीशांनी त्याला पुढे बोलावून कसून चौकशी केली आणि....
Video : कोर्टरूममध्ये पाणी पिणे 'लॉ'च्या विद्यार्थ्याला महागात पडले, न्यायाधीशांनी बोलावून...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पहिल्यांदाच कोर्टात आलेल्या 'लॉ'च्या विद्यार्थ्याला कोर्टाची कार्यवाही सुरू असताना पाणी प्यायल्याबद्दल फटकारताना आणि जाब विचारताना दिसत आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालय, ग्वाल्हेर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित आर्य यांच्या कोर्टरूममधील व्हिजिटर्स गॅलरीत बसलेल्या एका लॉच्या विद्यार्थ्याला त्याच्या स्वतःच्या बाटलीतून पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आला.

हा काय कॅफेटेरिया नाही-

विद्यार्थ्याने बाटलीतून पाणी पिण्याचे 'धाडस' करताच न्यायाधीशांनी त्याला पुढे बोलावून कसून चौकशी केली. तू कुठून आलाय?, कोणत्या कॉलेजमध्ये लॉचे शिक्षण घेतोय?, कोर्टात कसे बसावे याचे मूलभूत शिष्टाचार शिकला नाहीस का?, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्याच्यावर केली. विद्यार्थ्याने तो पंजाबमधील नामांकित कॉलेज एनएलयू कॉलेजचा असून कोर्टरूममध्ये पहिलाच दिवस असल्याचे सांगितल्यावर न्यायाधीशांनी आपला सूर आणखीनच उंचावला आणि कोर्टरूममधील मूलभूत शिष्टाचाराची कल्पना नसणे दुर्दैवी असल्याचे म्हणत त्याला झापले. 'हा काय कॅफेटेरिया नाही. तुम्ही पाहिजे तेव्हा बाटली उघडून पाणी पिण्यास सुरुवात करू शकत नाही. काही हवं असेल तर बाहेर जा. माझ्या कोर्टरूममध्ये पिण्याचे पाणी, कॉफी वगैरे पिण्यास परवानगी नाही', असे ते म्हणाले.

न्यायमूर्ती रोहित आर्य यांच्यावर टीकेची झोड

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर न्यायमूर्ती रोहित आर्य यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे. न्यायालयाची प्रतिष्ठा कोणत्याही किंमतीत जपली पाहिजे, पण न्यायमूर्तींचे हे वागणे योग्य नव्हे. न्यायालयांना मानवी बाजू असली पाहिजे असे एका वापरकर्त्याने पोस्टमध्ये म्हटले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in