कर्नल सोफियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करा! मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुवर विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी, संग्रहित छायाचित्र
कर्नल सोफिया कुरेशी, संग्रहित छायाचित्रफोटो - एएनआय
Published on

भोपाळ : कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुवर विजय शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिले आहेत.

मध्य प्रदेश हायकोर्टाने स्वत:हून कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानाची दखल घेतली व मंत्री शहा यांच्याविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्या. अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पोलीस महासंचालकांना बुधवारी सायंकाळपर्यंत मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच असे कृत्य पुन्हा केल्यास त्यांना न्यायालयाच्या अवमान कारवाईचा सामना करावा लागेल, असे बजावले.

याप्रकरणी सरकारी महाधिवक्त्यांनी वेळ मागितला असता न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांना निर्देश जारी केले व या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी करण्याचे निश्चित केले.

मंत्र्याच्या वकिलाने सांगितले की, न्यायालयाचा आदेश केवळ वर्तमानपत्रातील बातम्यांवर आधारित आहे. त्यावर न्यायालय म्हणाले की, याप्रकरणी ते अधिकृत पुरावा म्हणून व्हीडिओ लिंकचाही आधार घेतील.

logo
marathi.freepressjournal.in