रिलायन्स ‘एआय’मध्ये १० लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI इम्पॅक्ट समिटमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा

येत्या सात वर्षात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केली.
रिलायन्स ‘एआय’मध्ये १० लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI इम्पॅक्ट समिटमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांची घोषणा
Published on

­­नवी दिल्ली: येत्या सात वर्षात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केली. मोबाईल आणि इंटरनेट डेटा देशभर स्वस्त व सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात त्यांच्या समूहाने जे साध्य केले, तसेच काम ‘एआय’ क्षेत्रात करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

इंडिया ‘एआय’ इम्पॅक्ट समिटमध्ये बोलताना अंबानी म्हणाले की, या उपक्रमाद्वारे प्रत्येक नागरिक, उद्योग आणि सरकारी सेवा ‘एआय’ शी जोडली जाईल. जिओच्या डिजिटल क्रांतीप्रमाणेच ही परिवर्तनाची नवी लाट असेल. जिओने भारताला इंटरनेट युगाशी जोडले. आता जिओ भारताला इंटेलिजन्स युगाशी जोडेल. भारताला बुद्धिमत्ता भाड्याने घेणे परवडणारे नाही. त्यामुळे जसे आम्ही डेटा स्वस्त केला, तसेच आम्ही बुद्धिमत्तेचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी करू, असे त्यांनी सांगितले.

सात वर्षांत १० लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असेल. जामनगर येथे गिगावॉट क्षमतेचे ‘एआय’ रेडी डेटा सेंटर्स उभारले जातील, ज्यासाठी १० गिगावॉटपर्यंत हरित ऊर्जेचा वापर केला जाईल. तसेच देशभरात टेलिकॉम आणि डिजिटल ऑपरेटर जिओच्या नेटवर्कशी एकात्मिक ‘एज-कॉम्प्युट’ स्तर विकसित केला जाईल, ज्यामुळे कमी विलंब असलेली ‘एआय’ सेवा देशभर उपलब्ध होईल. ही संयमी, शिस्तबद्ध आणि राष्ट्रनिर्मितीसाठीची भांडवली गुंतवणूक आहे, जी दीर्घकालीन आर्थिक मूल्य आणि धोरणात्मक स्थैर्य निर्माण करेल, असे अंबानी म्हणाले.

अंबानी यांनी ‘जिओ इंटेलिजन्स’साठी पाच मार्गदर्शक तत्त्वे मांडली. डीप-टेक, उत्पादन आणि असंघटित क्षेत्रासाठी ‘एआय’ला प्राधान्य; जागतिक दर्जाची बहुभाषिक एआय; जबाबदारी, सुरक्षा आणि डेटा निवासीकरण, उच्च-कौशल्य रोजगारनिर्मिती तसेच उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांसह मजबूत ‘एआय’ परिसंस्था उभारणे आदींचा त्यात समावेश आहे.

बुद्धिमत्तेला सहानुभूतीची जोड देऊन सर्वांसाठी चांगले भविष्य घडवूया, असे आवाहन करत त्यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी ‘एआय’ हे प्रभावी साधन ठरेल. ‘एआय’मुळे समृद्धीचे युग सुरू होऊ शकते. ‘एआय’ हे एक तंत्रज्ञान नसून प्रथमच मानव मानवासारखी शिकणारी, बोलणारी, विश्लेषण करणारी आणि स्वयंचलितपणे कार्य करणारी प्रणाली निर्माण करत आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिओ भारताच्या परिवर्तनात मोठी भूमिका बजावेल

जिओ भारताच्या ‘एआय’ परिवर्तनात मोठी भूमिका बजावेल. प्रत्येक नागरिक, अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्र, सामाजिक विकासाच्या प्रत्येक पैलू आणि सरकारी सेवांपर्यंत बुद्धिमत्ता पोहोचवेल, असे त्यांनी सांगितले.

सार्वभौम संगणन पायाभूत सुविधा उभारणार

‘जिओ इंटेलिजन्स’ ही भारताची सार्वभौम संगणन पायाभूत सुविधा उभारेल. यामध्ये गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर्स, १० गिगावॉटपर्यंत सज्ज हरित ऊर्जा आणि जिओ नेटवर्कशी खोलवर एकात्मिक एज-कॉम्प्युट स्तर असेल. यामुळे किराणा दुकाने, दवाखाने, वर्गखोल्या ते शेतांपर्यंत सर्वांसाठी ‘एआय’ अधिक प्रतिसादक्षम, किफायतशीर आणि सर्वसमावेशक बनेल.

logo
marathi.freepressjournal.in