

नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिली बुलेट ट्रेनला चार वर्षे विलंब झाल्याने तिचा खर्च प्रचंड वाढला आहे. या योजनेचा खर्च आता ८३ टक्क्याने वाढून तो १.९८ लाख कोटींवर पोहचला आहे. ही योजना सुरू झाली तेव्हा तिचा खर्च १.१ लाख कोटी रुपये होता.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ही योजना राबवली जात आहे. या योजनेबाबत सरकारच्या ‘प्रगती’ उपक्रमांतर्गत ही माहिती दिली.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ सतीश कुमार म्हणाले की, बुलेट ट्रेनच्या सुधारित खर्चाबाबत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. पण, हा आकडा जवळपास १.९८ लाख कोटींवर गेला आहे. या खर्चाबाबत पुनर्परीक्षण सुरू असून एक ते दोन महिन्यात त्याला अंतिम रूप दिले जाईल. सूत्रांनी सांगितले की, गेल्याच महिन्यात रेल्वे खात्याच्या कामाचे परीक्षण करताना पंतप्रधानांनी बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
३२० किमीने धावणार
ही बुलेट ट्रेन योजना गुजरात, महाराष्ट्र व दादरा-नगर-हवेलीतून जाणार आहे. ताशी ३२० किमीने ही ट्रेन धावू शकेल, अशा पद्धतीने त्याचे डिझाईन केले. भविष्यात जपानचे ‘ई-१०’ शिंकानसेन ट्रेन धावू शकतील, अशी या मार्गाची उभारणी केली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरिया दरम्यान ऑगस्ट २०२७ रोजी सुरू करण्याची योजना आहे, तर पूर्ण मार्गिका डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अनेक कारणांमुळे विलंब
भूसंपादन, कायदेशीर व वैधानिक परवानग्यांना विलंब, ट्रेनची निवड करण्यासाठी लागलेला विलंब आदींच्या परिणामामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला उशीर झाला.
रेल्वेच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपर्यंत या योजनेची प्रगती ५५.६ टक्के, तर वित्तीय प्रगती ६९.६ टक्के होती. आतापर्यंत ८५,८०१ कोटी रुपये खर्च झाले आहे.