
भावनगर : भारताची पहिली बुलेट ट्रेन सेवा लवकरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर सुरू होणार असल्याचे सुतोवाच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी गुजरातच्या भावनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. भारताची पहिली वहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू झाल्यानंतर मुंबई - अहमदाबाद या दोन शहरातील अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत पार करता येणार आहे.
“मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार असून या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.
जेव्हा बुलेट ट्रेन धावायला लागेल तेव्हा मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे अंतर केवळ दोन तास सात मिनिटांवर येईल,” असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. भावनगर येथून सुरू होणाऱ्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी वैष्णव हे भावनगर टर्मिनस येथे आले होते.
दरम्यान, लोकसभेत नुकतेच एका लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, वापी आणि साबरमती दरम्यानच्या भागाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर संपूर्ण प्रकल्प (महाराष्ट्र ते साबरमती विभाग) डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भारताने या प्रकल्पासाठी जपानकडून कर्ज घेतले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्ये
५०८ किमींच्या मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी एकूण १२ स्थानके समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील चार स्थानके या मार्गावर आहेत. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च १,०८,००० कोटी रुपये आहे.