
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमध्ये कारवाई केली आहे. गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या छाप्यात मुंबई पोलिसांनी सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अमली पदार्थांची किंमत 1026 कोटी रुपये आहे. यावेळी पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईत काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर परिसरातून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी पहिल्या आरोपीला मार्च 2022 मध्ये गोवंडीतील शिवाजी नगर येथून अटक केली होती. त्याच्याकडून 250 ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी 700 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना अमली पदार्थांचा पुरवठा करणारी साखळी गुजरातमध्ये असल्याचे आढळून आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुजरातमधील अंकलेश्वर भागातील कारखान्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.
पोलिसांनी एका महिलेसह सात जणांना अटक केली आहे. त्यापैकी पाच जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही टोळी काही राज्यात कार्यरत असून तरुणांना लक्ष्य करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. एमडी ड्रग्जचा पुरवठा उच्चभ्रू वर्तुळात केला जातो.
गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने चिंतेचे वातावरण आहे. गुजरात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत NDPS ACT अंतर्गत 422 गुन्हे दाखल केले आणि सुमारे 667 ड्रग माफियांना तुरुंगात टाकले. त्यांच्याकडून 25 हजार 699 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये आहे.