सुरत : सुरतमधील हिरे व्यापाराचे केंद्र मुंबईला आल्यानंतर मुंबईतून जगाच्या कानाकोपऱ्यात हिऱ्यांची निर्यात केली जात होती, पण आता मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचे कार्यालय लवकरच बंद होणार आहे. सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी मिळून सुरतमध्ये अंदाजे ३ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. त्यामुळे हळूहळू मुंबईतील हिरे व्यापार बंद करून सुरतकडे सरकला आहे.
सुरत हे गेल्या अनेक वर्षांपासून हिरे व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. सुरतमधील हिरे आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, पण हिरे परदेशात निर्यात करण्यासाठी सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्याने कालांतराने हा व्यवसाय मुंबईत आला. ज्यानंतर सुरतमध्ये तयार करण्यात येणारे हिरे हे मुंबईतून परदेशात निर्यात केले जाऊ लागले. गेल्या तीन ते चार दशकांपासून बीकेसीमधील डायमंड मार्केटमधून हा व्यापार सुरू होता. आता सुरतमध्ये ‘सुरत डायमंड बोर्स’ नावाचे मोठे व्यापार केंद्र सुरू करण्यात आले असून अनेक व्यापाऱ्यांनी मुंबईतील बोऱ्याबिस्तारा गुंडाळून पुन्हा सुरतची वाट धरली आहे.
सुरतमध्ये बांधण्यात आलेल्या डायमंड बोर्स इमारतीमध्ये हिरे व्यापाऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईतून जगभरात हिऱ्यांचा व्यवसाय करणारे सुरतचे हिरे व्यापारी मुंबईतून आपला व्यवसाय बंद करून सुरतला स्थलांतरित होत आहेत. सुरत आणि मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे, यासाठी हिरे व्यापाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त पैसे देऊन सरकारकडून येथे जमिनी खरेदी केल्या होत्या.
आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सुरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, नवीन कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता, पण आता सुरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापाऱ्याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस तयार करण्यात आले आहे. आता सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत. त्यामुळे सुरतचे हिरे व्यापारी आता मुंबईऐवजी सुरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील, अशी माहिती सुरत डायमंड बोर्सचे समिती सदस्य दिनेश नावडिया यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारचा कर बुडणार
मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सुरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असून दरवर्षी तब्बल १७ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या या हिरे व्यापारामुळे महाराष्ट्र सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर मात्र बुडणार आहे.