गुजरातमध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा भंडाफोड; ७५ हजार रुपयात वैद्यकीय पदवी, २० वर्षांपासून फसवणूक सुरू १० कोटी रुपयांचा घोटाळा

गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ पदवीचा भंडाफोड झाला आहे. अहमदाबाद येथील डॉ. बी. के. रावत व डॉ. राजेश गुजराती यांच्या हातात ७५ हजार रुपये टेकवल्यानंतर ते वैद्यकीय पदवी हाती देत होते. आतापर्यंत १,५०० बनावट डॉक्टरांना त्यांनी वैद्यकीय पदवी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
गुजरातमध्ये ‘मुन्नाभाई एमबीबीएस’चा भंडाफोड; ७५ हजार रुपयात वैद्यकीय पदवी, २० वर्षांपासून फसवणूक सुरू १० कोटी रुपयांचा घोटाळा
Published on

सुरत : गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ पदवीचा भंडाफोड झाला आहे. अहमदाबाद येथील डॉ. बी. के. रावत व डॉ. राजेश गुजराती यांच्या हातात ७५ हजार रुपये टेकवल्यानंतर ते वैद्यकीय पदवी हाती देत होते. आतापर्यंत १,५०० बनावट डॉक्टरांना त्यांनी वैद्यकीय पदवी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

सुरतच्या पंडेसरा पोलिसांनी हे बनावट वैद्यकीय पदवीचे रॅकेट उघड केले. ज्यांना डॉक्टर व्हायचे आहे, त्यांना ‘बॅचरल ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथिक मेडिसीन’ (बीईएमएस) या बनावट पदवीचे प्रमाणपत्र जारी केले जात होते. या संपूर्ण व्यवहारात १० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

या घोटाळ्याचा आरोपी डॉ. रावत याच्याकडे ’बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन ॲॅण्ड सर्जरी’ची (बीएमएमएस) पदवी आहे. तर डॉ. गुजरातीकडे ‘डिप्लोमा इन होमिओपॅथी मेडिसीन ॲॅण्ड सर्जरी’ची पदवी आहे.

पोलीस उपायुक्त विजयसिंह गुर्जर म्हणाले की, ‘बोर्ड ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसीन’ या अनोंदणीकृत संस्थेच्यावतीने ही पदवी जारी केली जात होती.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट प्रमाणपत्रे आढळली, अर्ज, बनावट डॉक्टरांचे ओळखपत्र, १६०० बनावट डॉक्टरांची यादीही सापडली आहे. हे घोटाळेबाज बनावट पदवीसाठी दोन ऑफर देत होते. त्यात एका पदवीसाठी ७५ हजार रुपये आकारले जात होते. त्याची वार्षिक फी ३ हजार रुपये होती. तर दुसऱ्या पदवीसाठी दरमहा संरक्षक फी म्हणून ५ ते १० हजार रुपये आकारले जात होते.

विश्वास बसावा म्हणून वेबसाईट तयार केली

विशेष म्हणजे या टोळीने सर्वांना विश्वास बसावा म्हणून स्वत:ची वेबसाईट तयार केली होती. त्यात बनावट पदवी घेतलेल्यांची नावे, प्रमाणपत्र आदी नमूद केले होते. या बेवसाईटवरून ‘रिन्यूव्हल फी’ आकारली जात होती. या सर्व घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. रावतला प्रमाणपत्र, गुणपत्रिका, ओळखपत्र आदींवर स्वाक्षरी करायला ३० टक्के कमिशन मिळत होते. गेल्या २० वर्षांपासून तो पैसे उकळत होता. पोलिस आता त्यांची बँक खाती धुंडाळत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in