भाजपकडून मणिपूरमध्ये भारतमातेचा खून

राहुल गांधी यांचा लोकसभेत आरोप
भाजपकडून मणिपूरमध्ये भारतमातेचा खून

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकारणातून मणिपूरमध्ये भारतमातेचा खून केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केला. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने केंद्र सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्वाच्या प्रस्तावावर बुधवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार चर्चा झाली. त्यावेळी केलेल्या भाषणात राहुल यांनी हे वक्तव्य केले. खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतरचे त्यांचे हे पहिलेच भाषण होते.

मोदी मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत. त्यांनी अद्याप हिंसाचारग्रस्त राज्याला भेट दिलेली नाही. तेथील नागरिकांच्या व्यथा-वेदना त्यांना ऐकू येत नाहीत. रावण जसा केवळ मेघनाद आणि कुंभकर्णाचे ऐकायचा, तसेच मोदी केवळ अमित शहा आणि गौतम अदाणी यांचे ऐकतात. रावणाची लंका हनुमानाने जाळली नव्हती तर ती रावणाच्या अहंकारामुळे जळाली होती. मोदींनी मणिपूरच्या नागरिकांचा बळी देऊन हिंदुस्तानला ठार मारले आहे. त्यामुळे मोदी देशभक्त नसून देशद्रोही आहेत. मणिपूरपासून हरिणापर्यंत मोदी सर्वत्र केरोसिन ओतून आग लावण्याचे काम करत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.

राहुल गांधी यांनी साधारण ३० मिनिटे भाषण केले. त्यावेळी राज्यसभेतील अनेक खासदारही लोकसभेच्या प्रेक्षागृहात उपस्थित होते. राहुल यांनी मोदींवर आरोप करताच भाजप सदस्यांनी आरडाओरडा करत निषेध व्यक्त केला.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत ईशान्येकडील राज्यांत काँग्रेसमुळेच फुटीरतावादी चळवळी पसरल्या असल्याचा दावा केला. त्यावर काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहाच्या मध्यभागी दाव घेत निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी सभागृहातून बाहेर पडताना महिला खासदारांच्या दिशेने प्लाइंग किस दिला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी यांचे हे वर्तन अत्यंत अशोभनीय आहे. त्यातून त्यांच्या घराण्याचे संस्कार दिसतात. राहुल हे स्त्रीद्वेष्टे असून त्यांचे आजचे वर्तन सर्वांत हीन दर्जाचे आहे, असे भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी म्हटले. अनेक महिला खासदारांनी मिळून राहुल यांच्या या वर्तनाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि राहुल यांच्यावर कारवाईची मागणी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in