वसईतील डेटिंग अॅपवरील मैत्री आणि प्रेमात रुपांतर झालेल्या मैत्रीचे थेट दिल्लीत एका निर्घृण हत्येमध्ये रूपांतर झाले आहे. यामुळे दिल्लीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दिल्लीत हत्या झालेली तरुणी आणि तरुण वसई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीच्या मित्राने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे आणि वसईच्या माणिकपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे खुनाचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा वॉकर ही वसईच्या संस्कृती सोसायटीत वडील, आई आणि भावासोबत राहत होती. 2019 मध्ये श्रद्धा मालाडमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. वसईत राहणाऱ्या आफताब पुनावाला या तरुणाशी डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री झाली. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऑक्टोबर 2019 रोजी श्रद्धाने तिच्या कुटुंबीयांना आफताबच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितले. मात्र घरच्यांचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. यानंतर श्रद्धा ऑक्टोबरमध्येच वसईतील नायगाव येथे भाड्याच्या घरात आफताबसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. जानेवारी 2020 मध्ये कोविडमुळे श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी श्रद्धा 15 दिवसांसाठी घरी आली होती. त्यानंतर ती परत आफताबकडे राहायला गेली. दोन वर्षे नायगावमध्ये राहिल्यानंतर दोघेही मार्च २०२२ मध्ये दिल्लीला शिफ्ट झाले. दरम्यान, श्रद्धा तिचा कॉलेज मित्र लक्ष्मण नाडरच्या संपर्कात होती. ती त्याला सांगत होती की आफताब तिला खूप त्रास देत होता. मात्र अचानक मे महिन्यापासून श्रद्धा संपर्कात नव्हती. त्यामुळे श्रद्धाचा मित्र लक्ष्मण याला संशय आला. त्यांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी वसई पोलीस ठाण्यात श्रद्धाशी संपर्क न केल्याची तक्रार दाखल केली होती. वसई पोलिसांनी हा अर्ज माणिकपूर पोलिसांकडे तपासासाठी पाठवला. माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस संपतराव पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप यांना याचा संशय आल्याने त्यांनी श्रद्धाच्या वडिलांशी संपर्क साधून माणिकपूर पोलिस ठाण्यात श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर तपास सुरू झाला.
दरम्यान, आफताबचीही चौकशी केली असता आफताबने सांगितले की, मे महिन्यात श्रद्धाने त्याच्याशी भांडण केले आणि ती निघून गेली, ती आता कुठे आहे हे माहीत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आफताबच्या या वक्तव्यामुळे पोलिसांना अधिकच संशय आला. मात्र बेपत्ता झाल्याची घटना दिल्लीतील मेहरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पुढील तपासासाठी अखेर माणिकपूर पोलीस दिल्लीत पोहोचले. 9 नोव्हेंबर 2022 रोजी, श्रध्दाच्या बेपत्ता झाल्याची केस मेहरावली पोलीस स्टेशन, छतरपुरा, दिल्ली येथे दाखल करण्यात आली होती. माणिकपूर पोलिस आणि दिल्ली पोलिसांच्या एकूण तपासातून आफताबच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.