

लखनौ : बँका, व्यापारामध्ये घोटाळे होत आहेत. सरकार स्वतःचा घोटाळ्यात अडकले आहे. त्याचा मोठा परिणाम शिक्षण व विद्यार्थ्यांवर पडत आहे, अशी जोरदार टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी केली आहे.
पेपरफुटीच्या घटनांबाबत बोलताना मुरली मनोहर जोशी यांनी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी नाही असे नमूद केले. याचा संबंध समाज आणि प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचाराशीही असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पेपरफुटीच्या घटना एवढ्या चर्चेत का नव्हत्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
केवळ रस्ते बांधणे हा विकासाचा निकष असू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी मजबूत शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
परीक्षा नव्हे, युद्धच छेडल्यासारखे वाटते
पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारकडून विमान, सैन्य दल व सुरक्षांचा वापर केला जात आहे. असे वाटते की, परीक्षा नाही तर युद्धच पेटले आहे, अशी टीका जोशी यांनी केली.