ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यास मुस्लीम संघटनेचा विरोध

न्यायालयाने पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी ठेवली आहे
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ देण्यास मुस्लीम संघटनेचा विरोध

वाराणसी : पुरातत्त्व खात्याकडून ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यास आणखी आठ आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्याच्या मागणीस ज्ञानवापी मशीद व्यवस्थापन समितीने हरकत घेतली आहे. यामुळे ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आता अपूर्णच राहण्याची शक्यता आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने २१ जुलै रोजी आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया अर्थात भारतीय पुरातत्त्व खात्याला ज्ञानवापी परिसराचे तपशीलवार सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. यात जेथे आवश्यक असेल तेथे खोदकाम करण्यास अनुमती देण्यात आली होती. यामुळे ज्ञानवापी मशीद मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली होती की नाही, हे निश्चित करता येणार होते. ज्ञानवापी मशीद वाराणसीतील काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या बाजूलाच बांधण्यात आली आहे. पुरातत्त्व खात्याच्या संशोधनास मुस्लिमांनी मात्र विरोध केला आहे. ते अन्य ठिकाणी देखील परवानगीशिवाय तळघरांमध्ये खोदकाम करीत आहेत, अशी तक्रार मुस्लिमांनी केली आहे. काही खोदकाम पश्चिम भिंतीच्या जवळ झाले असून त्यामुळे इमारतीच्या मूळ ढाच्याला धोका निर्माण झाल्याचे मुस्लिमांचे म्हणणे आहे. याउलट सरकारी वकील राजेश मिश्रा यांनी पुरातत्त्व खात्याने जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्याकडे सर्वेक्षणासाठी आठ आठवडे मुदतवाढ द्यावी, असा अर्ज केला असल्याची माहिती दिली आहे. अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने सोमवारी आपली हरकत न्यायालयात दाखल केली आहे. सरकारी वकील मिश्रा यांनी मुस्लीम समाज पुरातत्त्व खात्याने मागितलेल्या मुदतवाढीला विरोध केला आहे. पुरातत्त्व खात्याला खोदकामातील माती आणि कचरा भरून बाहेर टाकण्यासाठी मुदतवाढ हवी आहे, असे मत त्यांचे वकील मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी ८ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in