भारत-फ्रान्स संरक्षण संबंध सुधारण्यावर भर मोदी-मॅक्रॉन भेटीत परस्परांशी वचनबद्धता

भारत-फ्रान्स संरक्षण संबंध सुधारण्यावर भर मोदी-मॅक्रॉन भेटीत परस्परांशी वचनबद्धता

भारत-फ्रान्स संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याचे वचन एकमेकांना दिले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये भागीदारीद्वारे भारत-फ्रान्स संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्याचे वचन एकमेकांना दिले.

जी-२० संघटनेच्या नवी दिल्लीतील शिखर बैठकीच्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी दुपारच्या भोजनावेळी वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली. मॅक्रॉन यांनी मोदींच्या कामाचे कौतुक केले, तर भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या काळात फ्रान्सकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मोदी यांनी मॅक्रॉन यांचे आभार मानले. मोदी यांच्या कार्यकाळात आफ्रिकन युनियनला जी-२०चे स्थायी सदस्यत्व मिळाल्याबद्दलही मॅक्रॉन यांनी समाधान व्यक्त केले.

फ्रान्स भारताला अनेक वर्षांपासून संरक्षण आणि अंतराळ संशोधनात खात्रीलायक मदत करत आला आहे. फ्रान्सची मिराज-२०००, राफेल ही लढाऊ विमाने भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात आहेत. फ्रान्सच्या सहकार्याने भारताने मुंबईतील माझगाव गोदीत सहा स्कॉर्पिन पाणबुड्यांची निर्मिती झाली आहे. हे सहकार्य आणखी वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाली. भारताने केवळ फ्रान्सकडून संरक्षण सामग्री खरेदी करण्यावर समाधान न मानता दोन्ही देशांनी एकत्रितपणे शस्त्रास्त्रे डिझाइन करून त्यांचे उत्पादन करावे, या संकल्पनेवर भेटीत अधिक भर देण्यात आला.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह रविवारी मोदी यांनी कॅनडा, कोमोरोस, तुर्कीये, संयुक्त अरब अमिराती (यूएई), दक्षिण कोरिया, ब्राझील, नायजेरिया आदी देश आणि संघटनांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा केली.

हिंद-प्रशांत क्षेत्रातही सहकार्य

दोन्ही नेत्यांच्या बैठकीत उभय देशांमधील सहकार्य वाढवण्याबरोबरच हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यावरही भर देण्यात आला. या प्रदेशात चीनचा प्रभाव वाढत असताना भारतासह अन्य देशांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याच्या भूमिकेचा मोदी आणि मॅक्रॉन यांनी पुनरुच्चार केला.

logo
marathi.freepressjournal.in