मोदींसारखे काम करण्याचा माझा प्रयत्न; जपानमध्ये मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढण्याचा आमदार योगेंद्र पुराणिकांचा संकल्प

राज्य शिक्षण मंडळाच्या एका त्रुटीमुळे १२ वीच्या परीक्षेत अपयश आले. या अपयशातून माझा जपानचा मार्ग गवसला.
मोदींसारखे काम करण्याचा माझा प्रयत्न; जपानमध्ये मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढण्याचा आमदार योगेंद्र पुराणिकांचा संकल्प

अनिलराज रोकडे/ वसई : मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून पुढे येत, आधी नोकरी आणि नंतर उद्योजक होत आता जपानमध्ये आमदार म्हणून निवडून आलो आहे. मुळचा राजकारणी नसलो, तरी जपानमध्ये मुख्यमंत्रीपदाची निवडणूक सरळ पद्धतीने मतदारातून होत असून, त्यामुळे त्यात संधी अधिक आहे. म्हणून जपानमधील पुढील मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी पुढील सहा वर्षे त्या पदासाठी स्वतःला तयार करणार आहे. म्हणून खास प्रशिक्षण सुद्धा घेत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुस्थानी मानून, त्यांचा आदर्श समोर ठेवून, त्यांच्यासारखे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असे उद्गार विरार येथे आयोजित दोन दिवसीय 'जागतिक मराठी संमेलना'चे अध्यक्ष, जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांनी 'दै. नवशक्ति'साठी विशेष मुलाखत देतांना काढले.

जागतिक मराठी अकादमीचे १९ वे जागतिक मराठी संमेलन 'शोध मराठी मनाचा' विरार येथे सुरू असून त्यात संमेलनाचे अध्यक्ष जपानचे आमदार, तथा एक यशस्वी मराठी उद्योजक योगेंद्र पुराणिक यांचा 'जागतिक मराठी भूषण सन्मान-२०२४' या पुरस्काराने विशेष सत्कार करण्यात आला आहे. आज पुराणिक यांनी 'दै. नवशक्ति'साठी विशेष मुलाखत देऊन, या मुलाखतीत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव आपल्यावर असल्याचे स्पष्ट केले. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान, अमेरिका आणि अन्य देशांतही नरेंद्र मोदींचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात असल्याची पुष्टीही पुराणिक यांनी एका अन्य प्रश्नांवर बोलतांना जोडली.

आजचे पंतप्रधान मोदी असा त्यांचा भारावून टाकणारा प्रवास जेव्हा मी पाहतो, त्यात असे दिसते की त्यांनी स्वतःला त्या पदासाठी तयार करून घेण्याकरिता खूप मेहनत आणि प्रशिक्षण घेतले आहे. मराठीत संवाद साधण्याचा योग जपानमध्ये येत नाही. या संमेलनाच्या निमित्ताने तो मिळाल्याचे समाधान व्यक्त करून ते बोलतांना पुढे म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाल्यावरही जपानने स्वतःला खूप लवकर सावरून, तंत्रज्ञानात मोठा पल्ला गाठला. धर्म, तत्त्वज्ञान आणि भाषा याबाबतीत भारताने आतापर्यंत जपानला मदत केली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या एका त्रुटीमुळे १२ वीच्या परीक्षेत अपयश आले. या अपयशातून माझा जपानचा मार्ग गवसला. वडिलांनी ज्ञानासाठी म्हणून दोन-तीन भाषा शिकून घेण्याचा सल्ला दिला. त्यात जपानी भाषेत मी पारंगत झालो. पुढील काही प्रयत्नात जपान वकीलातीने स्कॉलरशिप देऊ केल्याने, मी शिक्षणासाठी जपान गाठले. आधी नोकरी केली. त्या नंतर हॉटेल आणि अन्यही उद्योग सुरू केले. मेहनतीला यश मिळत गेले. वेळ मिळेल, तसे सामाजिक कामात रस घेऊ लागलो. अनेक उपक्रमात मला वक्ता म्हणून बोलायची संधी मिळू लागली. जपान सरकारने तेथे एक शाळा मला चालवायला दिली आहे. त्यातूनच पुढे तेथील विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. संपूर्ण जपानी भाषेत मी एक पुस्तक लिहिले असून, त्याचे प्रकाशन दि. २६ जानेवारी रोजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

एखाद्या अपयशातून खचून न जाता, उलट त्या अपयशाला जिद्दीचे नवे पंख लावून आकाशी भरारी घ्यायला शिकले पाहिजे. यात पालकांनी सुद्धा त्यांना समजून घेत सकारात्मकतेतून आवश्यक ते साहाय्य केले, तर यशाचे शिखर गाठणे अवघड नाही, असे आवाहन पुराणिक यांनी केले आहे.

भारताने जपानकडे दुर्लक्ष केले

भारत आणि जपानचे संबंध ७ व्या शतकापासूनचे असून, आधी जपान भाषेसाठी चीनची लिपी वापरायचे. नंतर त्यांनी भारतीय संस्कृत भाषेवर आधारित स्वतःची लिपी बनवली. शिक्षण, नोकरी आणि उद्योग या क्षेत्रात जपानमध्ये खूप मोठी संधी असून, मात्र भारताने जपानकडे दुर्लक्ष केले आहे. चीन मात्र याबाबत चाणाक्ष असून, जपानच्या अधिक संपर्कात आहे. मी भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी मुलांनी शॉर्टकट टाळून, भरपूर वाचन, चिंतन आणि अभ्यास केला पाहिजे. सर्वच क्षेत्रात शिस्त पाळण्यावर जोर दिला पाहिजे.

logo
marathi.freepressjournal.in