‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख कमावते..’ : आता सचिन तेंडुलकरचा Deepfake Video व्हायरल, लोकांना केले 'हे' आवाहन

सचिनने हा प्रकार त्याच्या चाहत्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच त्यांना जेव्हाही ऑनलाईन असे काही पाहतील तेव्हा त्यावर विश्वास न ठेवण्याचे तसेच त्याची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
‘माझी मुलगी दिवसाला 1.80 लाख कमावते..’ : आता सचिन तेंडुलकरचा Deepfake Video व्हायरल, लोकांना केले 'हे' आवाहन

तंत्रज्ञान हे आपले जीवन सुखकर व्हावे यासाठी असते. मात्र, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग किती धोकादायक ठरु शकतो याचा प्रचिती वारंवार येत आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि काजोल यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी डीपफेक व्हिडिओच्या बळी ठरल्या आहेत. यानंतर क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरला डीपफेकचा सामना करावा लागला आहे. त्याने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

सचिन तेंडुलकरचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने सोमवारी त्याच्या चाहत्यांना व्हायरल होत असलेल्या डीपफेक व्हिडिओबद्दल चेतावणी दिली आहे. मॉर्फ केलेल्या व्हिडिओमध्ये तेंडुलकर एका ऑनलाईन गेमिंगच्या अ‍ॅप्लिकेशनला मान्यता देताना दिसत आहे, ज्यात तो त्याची मुलगी सारा तेंडूलकर हे अ‍ॅप्लिकेशन वापरुन 'एविएटर' गेम खेळते आणि दररोज 1 लाख 80 हजार रुपये कमवत असल्याचा दावा करत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर सचिनचा चेहरा आणि आवाज मॉर्फ केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

सचिनने हा प्रकार त्याच्या चाहत्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. तसेच, त्यांना जेव्हाही ऑनलाईन असे काही दिसेल तेव्हा त्यावर विश्वास न ठेवण्याचे आणि त्याची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

"हे व्हिडिओ बनावट आहेत. तंत्रज्ञानाचा गैरवापर होताना पाहून त्रास होतो. मी प्रत्येकाला अशा व्हिडिओ, जाहिराती आणि अ‍ॅप्लिकेशनची तक्रार करण्याची विनंती करतो", असे सचिनने म्हटले आहे.

"सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सतर्क राहून अशाप्रकारच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याची गरज आहे. चुकीची माहिती आणि डीपफेकचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्याकडून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे", असेही सचिन म्हणाला. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

सारा तेंडुलकरही ठरली होती डीपफेकची बळी-

सचिन तेंडुलकरच्या आधी सारा तेंडुलकर देखील डीपफेकची बळी ठरली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या आयसीसी विश्वचषकादरम्यान भारताचा क्रिकेटपटू शुभमन गिल सोबत रिलेशनमध्ये असल्याची अफवा उठली होती. साराचा त्याच्यासोबतचा मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एका मुळ छायाचित्रात सारा ही तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरला मिठी मारत होती. परंतु, कोणी विकृताने अर्जुनच्या चेहऱ्याच्या जागी गिलचा चेहरा जोडून फोटो मॉर्फ करुन तो व्हायरल केला होता.

काय आहे डीपफेक तंत्रज्ञान?

डीपफेक तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक प्रकार असून त्याचा वापर लोक अशा गोष्टींसाठी करत आहेत जे ते प्रत्यक्षात कधीच करु शकले नसते. एखाद्या व्यक्तीच्या फोटो आणि व्हिडिओंच्या डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे स्वरुप आणि आवाज याचे वास्ववादी मॉडेल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बनवली जाते. यालाच डीप सिंथेसिस तंत्रज्ञान म्हणतात. डीपफेक हे सखोल संश्लेषण तंत्रज्ञानातील सर्वात कुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे.

logo
marathi.freepressjournal.in