म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंपाची शक्यता; आयआयटी शास्त्रज्ञाचा इशारा

म्यानमारप्रमाणेच भारतालाही विध्वंसक भूकंपाचा धक्का बसणार असल्याचा इशारा आयआयटी कानपूरमधील एका शास्त्रज्ञाने मंगळवारी दिला.
म्यानमारप्रमाणे भारतात विध्वंसक भूकंपाची शक्यता; आयआयटी शास्त्रज्ञाचा इशारा
Published on

नवी दिल्ली : म्यानमारप्रमाणेच भारतालाही विध्वंसक भूकंपाचा धक्का बसणार असल्याचा इशारा आयआयटी कानपूरमधील एका शास्त्रज्ञाने मंगळवारी दिला.

आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले की, म्यानमार आणि बँकॉकमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे मूळ कारण ‘सागिंग फॉल्ट’ आहे. ‘सागिंग फॉल्ट’ अतिशय धोकादायक असून, नकाशाद्वारे हा फॉल्ट सहज पाहता येतो. मलिक म्हणाले, भारताच्या पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये ‘गंगा-बंगाल फॉल्ट’ आहे, तर म्यानमारमध्येही ‘सागिंग फॉल्ट’ आहे. या दोन फॉल्टमध्ये इतर अनेक ‘फॉल्ट लाइन्स’ आहेत. अशा परिस्थितीत, एक फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे दुसरा फॉल्टदेखील सक्रिय होऊ शकतो आणि यामुळेच भारतातदेखील भयंकर भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झोन-५ वर विशेष लक्ष गरजेचे

भारतात कोणत्याही मोठ्या भूकंपाची आपण वाट पाहू नये, हिमालयात अनेक सक्रिय फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रांमध्ये प्रचंड संशोधनाची गरज आहे. याशिवाय या भागात जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून भूकंपाचा प्रभाव कमी करण्याचे काम करण्यात यावे, असेही मलिक म्हणाले.

सागिंग फॉल्ट

ते पुढे म्हणाले, सागिंग हा फार जुना फॉल्ट आहे. उत्तर-पूर्व शिअर झोन हा आराकान ते अंदमान आणि सुमात्रापर्यंतच्या सबडक्शन झोनचा एक भाग आहे. सागिंग फॉल्टही अगदी जमिनीवरून दिसतो. जपानी आणि युरोपियन तज्ज्ञांनी सागिंगवर काम केले आहे. अनेक संशोधनातून असेही समोर आले आहे की, येथे दर १५० ते २०० वर्षांनी भूकंपाची वारंवारता असते.

logo
marathi.freepressjournal.in