Nagastra-1 : भारतातील पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल; ३० किमी दूरपर्यंत मारक क्षमता; बघा वैशिष्ट्ये

लष्कराने नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजला ४८० आत्मघातकी ड्रोनची ऑर्डर दिली होती. त्यातील १२० ड्रोनची डिलिव्हरी त्यांनी लष्कराला दिली आहे.
Nagastra-1 : भारतातील पहिले स्वदेशी आत्मघातकी ड्रोन लष्करात दाखल; ३० किमी दूरपर्यंत मारक क्षमता; बघा वैशिष्ट्ये
सौ - एएनआय

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे आत्मघातकी ड्रोन ‘नागास्त्र-१’ हे भारतीय लष्करात दाखल झाले आहे. या ड्रोनची मारक क्षमता ३० किमी असून ते दोन किलो दारुगोळा नेण्यास सक्षम आहे. यामुळे लष्कराची मारक क्षमता वाढणार आहे.

लष्कराने नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीजला ४८० आत्मघातकी ड्रोनची ऑर्डर दिली होती. त्यातील १२० ड्रोनची डिलिव्हरी त्यांनी लष्कराला दिली आहे.

‘नागास्त्र-१’ची वैशिष्ट्ये

या ड्रोनमुळे शत्रूच्या प्रशिक्षण केंद्रावर लक्ष ठेवणे, लाँचपॅडवर हल्ला करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सैनिकांच्या जीवाला असलेला धोका कमी केला जाऊ शकतो. हे ड्रोन हवेत आपल्या ‘टार्गेट’च्या आजूबाजूला फिरून आत्मघातकी हल्ला करतात. या ड्रोनमध्ये सेन्सर बसवले असून, हे ड्रोन १२०० मीटर उंचीपर्यंत नेले जाऊ शकतात. ड्रोनचे वजन १२ किलो असून २ किलो स्फोटके नेण्याची त्यांची क्षमता आहे. हे ड्रोन एक तास हवेत राहू शकतात. तसेच ‘टार्गेट’ न मिळाल्यास हे ड्रोन परत येतात किंवा पॅराशूटच्या सहाय्याने त्यांचे लँडिंग केले जाऊ शकते.

अमेरिकेतून येणार ‘एमक्यू-९ बी’ ड्रोन

अमेरिकेने भारताला ३१ ‘एमक्यू-९ बी’ ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा ३३ हजार कोटी रुपयांचा व्यवहार आहे. या ड्रोनचा वापर चीनशी संबंधित ‘एलएसी’, समुद्रात गस्त व सुरक्षा वाढवण्यासाठी केला जाणार आहे. हे ड्रोन ३५ तास हवेत राहू शकतात. तसेच ते पूर्णपणे रिमोट कंट्रोलने वापरता येतात.

logo
marathi.freepressjournal.in