नायब सिंग सैनी होणार हरयाणाचे नवे मुख्यमंत्री; कसा राहिलाय राजकीय प्रवास? वाचा

हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायब सिंग सैनींची निवडीमागे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे गणित आहे.
नायब सिंग सैनी होणार हरयाणाचे नवे मुख्यमंत्री; कसा राहिलाय राजकीय प्रवास? वाचा

नवी दिल्ली : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजनामा दिला आहे. यानंतर नायब सिंग सैनी यांची हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. सैनी आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारात हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली आहे.

मनोहरलाल खट्टर यांनी आज (१२ मार्च) सकाळी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होणार, यावर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु सैनी यांचे नाव भाजपकडून आल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. भाजप अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने हरयाणामध्ये सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

कोण आहे नायब सिंग सैनी?

सैनी हे मनोहरलाल खट्टर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते भाजप हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. २०१० मध्ये, सैनी यांनी नारायणगड मतदारसंघात रामकिशन गुर्जर यांच्यावर ३०२८ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यानंतर, २०१४ मध्ये सैनींना राज्याच्या मंत्रिमंडळात देखील काम करण्याची संधी मिळाली होती.

भाजप पक्षाप्रती अढळ निष्ठा, व्यापक लोकप्रियता, विशेषत: ओबीसी प्रवर्गातील नेता अशी सैनी यांची ओळख आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली आहे.

नायब सिंग सैनींच्या निवडी मागचे 'हे' आहे कारण?

हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायब सिंग सैनींची निवडीमागे भाजपचे लोकसभा निवडणुकीचे गणित आहे. कारण हरयाणाच्या कुरुक्षेत्र, यमुनानगर, अंबाला, हिसार आणि रेवाडी जिल्ह्यांसह विविध भागात ८ टक्के असलेल्या सैनी समुदायाकडून पाठिंबा मिळविण्याची भाजपची रणनीती आहे.

अपक्ष आमदार नयन पाल रावत यांनी भाजप आणि जेजेपी यांच्यातील तणावपूर्ण संबंधांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे सूचक विधान केले होते. तथापि, अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा कायम आहे, अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे अपक्ष आमदार धरमपाल गोंडर यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देत असून पुढेही राहील, असा पुनरुच्चार केला.

logo
marathi.freepressjournal.in