छोट्या कंपन्यांची हमी मोठी! बड्या कंपन्यांमध्ये AI मुळे नोकरी जाण्याची शक्यता अधिक - नंदन निलेकणी

ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे कामे अधिक सुलभ होत असल्याने येत्या काही वर्षांत भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
छोट्या कंपन्यांची हमी मोठी! बड्या कंपन्यांमध्ये AI मुळे नोकरी जाण्याची शक्यता अधिक - नंदन निलेकणी
छोट्या कंपन्यांची हमी मोठी! बड्या कंपन्यांमध्ये AI मुळे नोकरी जाण्याची शक्यता अधिक - नंदन निलेकणी(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) मुळे कामे अधिक सुलभ होत असल्याने येत्या काही वर्षांत भारतातील मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात रोजगाराचा मुख्य आधार लाखो लहान व्यवसायच असतील, असे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी गुरुवारी सांगितले.

एनसीएईआरचे अध्यक्ष असलेल्या निलेकणी यांनी ‘एनसीएईआर इंडिया पॉलिसी फोरम २०२६’मध्ये भारत रोजगार निर्मितीकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या ‘मानसिक मॉडेल’मध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन केले.

अत्यंत सुव्यवस्थित असलेल्या मोठ्या कंपन्यांमधील नोकऱ्यांवर गंडांतर येण्याचा धोका सर्वाधिक असेल. कारण तेथे प्रत्येक नोकरी ही ठराविक कामांच्या संचापुरती मर्यादित असते. त्यामुळे ती कामे ऑटोमेट करून नोकऱ्या कमी करणे सोपे आहे. म्हणूनच, येत्या काळात मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची निव्वळ घट होण्याचीच शक्यता जास्त आहे, असे निलेकणी म्हणाले. याउलट, भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य हे तिच्या ‘लाखो लहान व्यवसायांमध्ये’ आहे. ते एआयमुळे होणाऱ्या बदलांना तोंड देण्यास अधिक सक्षम आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. जेव्हा तुमच्याकडे लाखो लहान कंपन्या असतात तेव्हा त्यांना प्रभावित करण्यासाठी एआयचा वापर करणे अधिक गुंतागुंतीचे असते. त्यामुळे या लहान कंपन्या नोकऱ्यांच्या नुकसानापासून अधिक सुरक्षित आणि लवचिक असतात. तसेच त्या अधिक नवीन रोजगार निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

बदलाला पाठबळ देण्यासाठी निलेकणी यांनी मोठ्या प्रमाणावर अनियंत्रण आणि सोप्या व्यवसाय पद्धतींच्या गरजेवर भर दिला. लहान उद्योजकांवर नियमांचा अतिरिक्त भार पडू नये म्हणून त्यांचे रक्षण केले पाहिजे. तसेच रिझर्व्ह बँकेच्या ‘अकाऊंट ॲग्रिगेटर’ आणि ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना भांडवल आणि बाजारपेठ सहज उपलब्ध करून दिली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

रोजगारनिर्मिती कशी होईल याचा विचार आपल्याला खरोखर नव्याने करावा लागेल, असे इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी म्हटले आहे.

निलेकणी उवाच...

निलेकणी यांनी नमूद केले की, काही विशिष्ट कंपन्यांनीच लाखांच्या संख्येने लोकांना कामावर ठेवावे अशी अपेक्षा करण्याऐवजी ‘लाख कंपन्या प्रत्येकी एका व्यक्तीला रोजगार देतील’ या तत्त्वावर अर्थव्यवस्था विस्तारत जाईल. भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या १,५०,००० स्टार्टअप्सवरून २०३५ पर्यंत १० लाख स्टार्टअप्सचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर भारत आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in