

नवी दिल्ली: जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नौकानयनाचे स्वातंत्र्य आणि खलाशी यांच्या सुरक्षेचे आवाहन केले.
‘ब्रिक्स बिझनेस फोरम’ मध्ये बोलताना ते म्हणाले, ‘समुद्री मार्ग सुरक्षित असतील, पुरवठा साखळी मोकळी राहील आणि खलाशी सुरक्षित असतील तरच जागतिक व्यापार पुढे जाऊ शकतो. म्हणूनच भारत नौकानयनाच्या स्वातंत्र्याचा आणि खलाशांच्या सुरक्षेचा खंबीर पुरस्कर्ता आहे.’ जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत हा विकास आणि स्थिरतेचा विश्वासार्ह स्रोत आहे, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, संपूर्ण जगात व्यापारावर बंधने/अडथळे येत असताना भारत आर्थिक संबंध दृढ करत आहे.
त्यांनी ‘ब्रिक्स बिझनेस कौन्सिल’ला १० व्यापार अडथळे दूर करण्याबाबत अहवाल तयार करण्याचे आणि दरवर्षी १०० ब्रिक्स स्टार्टअप्सना त्यांचा विस्तार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. तसेच कौन्सिलला १,००० नवीन भागीदाऱ्या विकसित करण्याची विनंती त्यांनी केली. या निकषांवर आपल्याला दरवर्षी प्रगतीचा आढावा घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
या मंचवर बोलताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन म्हणाले की, जग सध्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या अत्यंत गुंतागुंतीच्या टप्प्यातून जात आहे. त्यांनी ब्रिक्स सदस्यांमधील व्यापारात राष्ट्रीय चलनांचा वापर वाढवण्याची सूचना केली.
ते म्हणाले, "ब्रिक्स देशांमधील व्यापार वाढवण्यासाठी, आपण विखुरलेल्या सहकार्यातून व्यापार पायाभूत सुविधांच्या टप्प्याटप्प्याने एकत्रीकरणाकडे वळले पाहिजे. या संदर्भात, प्रक्रियांचे डिजिटलीकरण आणि एकत्रीकरण, व्यापार सुलभता, नियमन व प्रशासकीय अडथळे कमी करणे, सीमापार बाजारपेठांचा विकास आणि संयुक्त खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीस प्रोत्साहन यासह अनेक उपाय विशेष महत्त्वाचे आहेत."
भारतात २ लाख स्टार्टअप
२ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि १२० युनिकॉर्न्ससह भारत जागतिक समस्यांवर उपाय शोधणारे केंद्र बनत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.