... त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली - मोदी; 'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी काँग्रेसने वगळल्याचा आरोप

'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी १९३७ मध्ये वगळण्यात आली आणि त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली, हीच फुटीर मानसिकता अद्यापही देशापुढील आव्हान आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॉग्रेसवर केली.
... त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली - मोदी; 'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी काँग्रेसने वगळल्याचा आरोप
... त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली - मोदी; 'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी काँग्रेसने वगळल्याचा आरोप
Published on

नवी दिल्ली : 'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी १९३७ मध्ये वगळण्यात आली आणि त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली, हीच फुटीर मानसिकता अद्यापही देशापुढील आव्हान आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॉग्रेसवर केली.

‘वंदे मातरम्' हे शब्द एक मंत्र, एक ऊर्जा, एक स्वप्न, एक संकल्प आहे, असे पंतप्रधान मोदीं यांनी म्हटले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत ऐतिहासिक कार्यक्रम मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त मोदी यांनी एक स्मारक नाणे व एक स्मारक टपाल तिकीट प्रकाशित केले.

“वंदे मातरम् हे शब्द भारतमातेची भक्ती आहेत, भारतमातेची आराधना आहेत. एवढेच नाही तर हे शब्द आपल्याला इतिहासात परत घेऊन जातात आणि आपल्या वर्तमानाला नवा आत्मविश्वास आणि आपल्या भविष्याला प्रेरणा देतात. वंदे मातरम् हे शब्द म्हणजे असा कोणताही संकल्प नाही जो साध्य करता येत नाही, असे कोणतेही ध्येय नाही जे आपण साध्य करू शकत नाही, म्हणजेच वंदे मातरम्”, असे मोदींनी म्हटले आहे.

स्वातंत्र्य चळवळीचा आवाज

“वंदे मातरम्' हे शब्द आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्याला हे शब्द बळ देतात. हे गीत पिढ्यानपिढ्या भारतीयांच्या हृदयात उत्साह आणि देशभक्ती निर्माण करते. वंदे मातरम् केवळ एक गीत नव्हते तर स्वातंत्र्यलढ्याचा आवाज होता. ज्यामुळे प्रत्येक क्रांतिकारी भारत माता की जय म्हणू लागला. याच भावनेने देशाला गुलामगिरीतून मुक्त होण्याची ताकद दिली. गुलामगिरीच्या काळ्या काळात, वंदे मातरम् हा भारतमातेच्या मुक्तीचा मंत्र बनला. या गाण्याने प्रत्येक भारतीयाच्या मनात हा संकल्प जागृत केला की भारतमातेची मुले स्वतःचे भाग्य स्वतः घडवतील, असे मोदी म्हणाले.

अस्तित्वाची ओळख

मोदी पुढे म्हणाले की, हे येणारे वर्ष देशाच्या एकतेचे, अखंडतेचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक बनेल. हा उत्सव भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आणि आजही आपल्याला प्रेरणा देणाऱ्या आत्म्याला पुनरुज्जीवीत करेल. “वंदे मातरम् हा केवळ इतिहास नाही, तर तो भारताच्या अस्तित्वाची ओळख आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेसचा पलटवार

'वंदे मातरम्'मधील महत्त्वाची कडवी १९३७ मध्ये वगळण्यात आल्याच्या आरोपावर काँग्रेसने पलटवार केला आहे. स्वत: गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी पहिली दोन कडवीच स्वीकारा, अशी सूचना केली होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर फुटीर विचारसरणीला आश्रय देत असल्याचा आरोप मोदी यांनी करणे ही लज्जास्पद बाब आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in